होमपेज › Marathwada › प्रशिक्षणातून घडणार जलयुक्‍तचे दूत

प्रशिक्षणातून घडणार जलयुक्‍तचे दूत

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 10:56PM



बीड : दिनेश गुळवे

जलयुक्तमधून अनेक गावांची पाणीटंचाई सरून गावे पाणीदार झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी भगीरथ ठरलेली ही योजना यावर्षी जिल्ह्यातील 235 गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी तब्बल बाराशे जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणातून गावांचा जलआराखडा तयार करण्यासह कामांची योग्य अंमलबजावणी करण्याचे काम सोपविण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात सरासरी 666 मी मी पाऊस पडतो. असे असले तरी जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या तालुक्यात हमखास पाणीटंचाई असते. दोन वर्षांपूर्वीच बीड जिल्ह्यात आठशे ते एक हजार टँकर सुरू होते. गावोगाव तीव्र पाणीटंचाई असल्याने याचा परिणाम शेतीपिकांवरही होतो. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्यासह शेतशिवार हिरवेगार करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना महत्त्वाची ठरली आहे. 

गावात 5 जणांना प्रशिक्षण

यावर्षी जिल्ह्यातील 235 गावांचा या योजनेसाठी समावेश झाला आहे. या गावांमध्ये आता प्रत्त्येकी पाच जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. यामध्ये दोन शासकीय व तीन इतर प्रतिनिधी राहणार आहेत. प्रशिक्षण दिल्यानंतर या कामांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार कामे करण्यात येणार आहेत. आराखड्यातील कामे योग्य पद्धतीने करून घेणे, अंमलबजावणी करणे आदी जबाबदारी प्रशिक्षणार्थिंवर राहणार आहे. त्यामुळे हे प्रशिक्षणार्थी आता जलयुक्तचे दूत म्हणून काम करणार आहेत. 

पाणी पातळीत होणार वाढ
जलयुक्तच्या कामांमुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत मोठी वाढ होणार असून, यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटू शकतो. 

जलयुक्तच्या कामामधून कंपार्टबंडिंग, डीप सीसीटी, माती नाला बांध, सिमेंट बंधारे, सिमेंट बंधारे दुरुस्ती, वनतळे, शेततळे आदी कामे करण्यात येतात. या योजनेत 2015-16 मध्ये 271 गावांमध्ये 180 कोटींची कामे करण्यात आली. 

2016-17 मध्ये 256 गावांमध्ये 250 कोटींची पाच हजार 73 कामे करण्यात आली. 

2017-18 मध्ये 195 गावांमध्ये 139 कोटींची तीन हजार 385 कामे करण्यात आली. या योजनेतून मोठ्या प्रमाणावर कामे झाल्याने शेतशिवार हिरवेगार तर झालेच आहे, शिवाय गावांची पाणीटंचाईही दूर झाली आहे. 

Tags : Marathwada, water. saving. training