Wed, Jun 26, 2019 18:16होमपेज › Marathwada › वडवणीतील जनतेची पाण्यासाठी भटकंती

वडवणीतील जनतेची पाण्यासाठी भटकंती

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 12:01AMवडवणी : अशोक निपटे

वडवणी तालुक्यातील अनेक गावात तसेच वाड्या, वस्तावर सध्या भीषण पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. निवडणूक काळात मतदारसंघाला चोवीस तास उपलब्ध असल्याचा दावा करणारे नेते, आता टंचाईकाळात मात्र दिसेनासे झाले असल्याने जनतेमधून नाराजीची भावना व्यक्त होत आहे.

गेल्या पावसाळ्यात वडवणी तालुक्यात पाहिजे तेवढा पाऊस झाला नव्हता. त्यातच जमिनीतील पाण्याचा बोअरच्या माध्यमातून अवाजवी उपसा होत असल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक गावच्या विंधन विहिरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. एप्रिल पासून तर नव्वद टक्के विंधन विहिरी कोरड्याठाक पडलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाण्यासोबतच पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक गावात टँकरची मागणी केली आहे, मात्र वडवणी तहसीलदारांना पाणी टंचाईकडे बघायला वेळच नाही. त्यामुळे अद्यापही अनेक गावात टँकर सुरू झाले नाही. या भागाचे आमदार आर. टी. देशमुख यांनीही पाणी टंचाईची कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही. खासदारांना तर पाणी प्रश्नासारख्या गोष्टीकडे लक्ष देणे शक्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 

प्रशासकीय यंत्रणा  झोपेत

वडवणी तालुक्यातील अनेक गावांत तसेच वाड्या तांड्यावर  सध्या भीषण पाणी टंचाईची झळ नागरिकांना सहन करावी लागत आहे. पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे, मात्र याकडे तालुका प्रशासनाचे लक्ष दिसून येत नाही.

प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लक्ष देण्यास वेळ नसल्याने पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सहन करावा लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

विजेचा लपंडाव
वडवणी तालुक्यातील सर्वच गावांत सध्या विजेच्या लपंडाव चालू आहे.  वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी जाणीवपूर्वक वीजपुरवठा सुरळीत करीत नाहीत. त्यामुळे विंधन विहीरीला पाणी असुनही विजे अभावी विद्युत पंप चालविणे शक्य होत नाही. वीज नसल्याने पाणी उपलब्ध असूनही त्याचा उपसा करता येत नाही.