Tue, May 21, 2019 19:04होमपेज › Marathwada › पाणीपट्टी वाढ मनपाकडून रद्द

पाणीपट्टी वाढ मनपाकडून रद्द

Published On: Feb 11 2018 1:03AM | Last Updated: Feb 11 2018 12:58AM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

समांतर जलवाहिनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मनपाने पाणीपट्टीत दरवर्षी दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार दरवर्षी ही वाढ होत आहे, परंतु आता समांतरचे कंत्राटच रद्द झाल्याने ही वार्षिक दरवाढ रद्द करण्याचा ठराव शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. मात्र या ठरावाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीविषयी संभ्रम आहे. वार्षिक दरवाढीचा समावेश असलेला उपविधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडूनच ही दरवाढ रद्द व्हावी लागेल, असे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने पीपीपी तत्त्वावर समांतर जलवाहिनी योजना तयार केली. या योजनेच्या अंमलबजावणीआधी शासनाकडून नवीन उपविधी मंजूर करून घेण्यात आला. त्यात पाणीपट्टी दरात दरवर्षी 10 टक्के वाढ करण्याची तरतूद करण्यात आली. त्यामुळे पाच वर्षांपासून दरवर्षी 1 एप्रिलपासून ही दरवाढ अमलात येत आहे. मात्र मनपाने वर्षभरापूर्वीच समांतर जलवाहिनीचा युटिलिटी कंपनीसोबतचा करार रद्द केला, तरीही दरवाढ मात्र रद्द झालेली नाही.