Fri, Jul 19, 2019 05:42होमपेज › Marathwada › अभियंत्याचे अपहरण; चौघांविरुद्ध गुन्हा

अभियंत्याचे अपहरण; चौघांविरुद्ध गुन्हा

Published On: Mar 25 2018 1:25AM | Last Updated: Mar 25 2018 1:25AMवसमत : प्रतिनिधी

म्हातारगाव येथील शेतकर्‍यांना मागील पाच महिन्यांपासून रोहित्र  मिळत नसल्याने संतप्‍त शेतकर्‍यांनी शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास हिंगोली येथून महावितरणच्या अभियंत्यास म्हातारगाव येथे नेऊन शेतात ठेवल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी शेतकर्‍यांनाच दोषी धरून महावितरणचे अभियंता सचिन बेरसले यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बाजार समितीच्या संचालकासह तिघा शेतकर्‍याविरुद्ध शासकीय कामात अडथळ्यासह अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने म्हातारगाव येथील शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे.

म्हातारगाव शिवारातील रोहित्र मागील पाच महिन्यांपासून जळाल्यामुळे रोहित्राच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी हिंगोली येथील कार्यालयात चकरा मारल्या; परंतु महावितरणकडून रोहित्र दिले जात नव्हते. रोहित्राअभावी पाणी असूनही पिके वाळून गेल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. शेवटी 23 मार्च रोजी शेतकर्‍यांना शंभर ऐवजी 65 एमव्हीएचे रोहित्र देण्यात आले. यामुळे संतप्‍त झालेल्या शेतकर्‍यांनी महावितरणचे अभियंता एस. डी. बेलसरे यांना हिंगोली येथील एमआयडीसीमध्ये बोलावून म्हातारगावात नेले. जोपर्यंत रोहित्र मिळत नाही तोपर्यंत अभियंत्यास सोडणार नसल्याचे भूमिका शेतकर्‍यांनी घेतली होती. रात्री उशिरा महावितरणच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांची समजूत काढून बेलसरे यांची सुटका करवून घेतली. या वेळी अभियंता महाजन, वसमतच्या फौजदार रूपाली कांबळे उपस्थित होत्या. या प्रकरणी बेलसरे यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बाजार समितीचे संचालक तुषार जाधव यांच्यासह इतर तिघा अनोळखी शेतकर्‍यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Tags  : parbhani, parbhani news, vsmat engineer kidnap, crime register, crime