Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Marathwada › धान्य साठवण्याची कणगी अडगळीत

धान्य साठवण्याची कणगी अडगळीत

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:30AMफाळेगाव :  बाबूराव धवसे

ग्रामीण भागात बहुतांश शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतात. शेतकरी पूर्वी आपल्या शेतातील पिकवलेले धान्य एका कणगी (मुडी) मध्ये ठेवत असत, परंतु सद्यःस्थितीत ग्रामीण भागात कणगी ही अडगळीत पडली आहे. तर कणगीचा जागा आता लोखंडी साहित्याने घेतल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात आज मोठ्या प्रमाणावर मुख्य व्यवसाय शेती हा होय. शेतीतील खरीप, रब्बी हंगामात पिकांचे उत्पादन घेतल्या जाते. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, मूग, उडीद यासह कडधान्य साठवण्यासाठी पूर्वी कणगीचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. पूर्वी वापरात असलेल्या कणगीमध्ये दोन ते तीन वर्षांपर्यंत कीड लागत नसे. अशा कणगी सर्वच ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग वापरत असे. कणगीमध्ये धान्य साठवण्यापूर्वी काही पध्दती अवलंबविल्या जात होत्या. एका कणगीमध्ये जवळपास 60 मन धान्य साठवण्याची क्षमता होती. कणगीत धान्य साठवल्यानंतर वरच्या बाजूला शेण व लिंबाच्या पाचोळ्यापासून सारवून पूर्ण बंद केली जात असते. त्यामुळे कणगीमधील धान्य दोन ते तीन वर्षांपर्यंत जशास तसे राहत असे. सदरील धान्य खराब व किडा न लागताच राहत होते.ग्रामीण भागात काही ठिकाणी केवळ नावालाच कणगी उरली आहे. पूर्वी कणगी ही पारंपरिक पध्दत म्हणून वापरात होती. कणगी प्रामुख्याने पिंठुड्डी, धामन, सिंदाड, बांबू आदींपासून बनवली जात होती. कणगी चौकोनी व वर्तुळाकार अशा पध्दतीने बनवल्या जात असत. यात चौकोनी कणगीला ग्रामीण भागात मोठी मागणी असायची. मात्र कालांतराने मोठा बदल होऊन पूर्वीच्या कणगीची जागा आता लोखंडी साहित्याने घेतल्याने कणगी कालबाह्य झाली आहे.