Thu, Apr 25, 2019 11:40होमपेज › Marathwada › जीवाच्या मैत्रीला लाभणार स्मारकाचे कोंदण

जीवाच्या मैत्रीला लाभणार स्मारकाचे कोंदण

Published On: Dec 20 2017 10:56AM | Last Updated: Dec 20 2017 10:56AM

बुकमार्क करा
नाना-नानी पार्कला दररोज शेकडो लोक भेट देतात. लहान-थोरांच्या या आवडीच्या उद्यानात या नेत्यांचे पुतळे एकत्र उभारल्यास लातूर शहराला वेगळी ओळख मिळणार असून निर्लेप व निरपेक्ष मैत्रीचा वस्तूपाठही त्यामुळे पुन्हा उजळ होणार आहे.


लातूर : शहाजी पवार

राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. हे मैत्र आता स्मारकाच्या रुपात उभारणार असून, याअंतर्गत या दोन्ही नेत्यांचे देखणे पुतळे उभारण्यात येणार आहेत. सोमवारी (दि.18) झालेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत यास तत्त्वता मंजुरी देण्यात आली.

मराठवाड्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे विलासराव व गोपीनाथराव हे विरोधी पक्षात असले तरी त्यांच्या निखळ व निर्मळ मैत्रीत तसूभरही अंतर पडले नाही. विकासाच्या नावावर त्यांनी कधीही राजकारण केले नाही. ते दोघे एका व्यासपीठावर आले की त्यांना ऐकण्यास नागरिकांना पर्वणीच वाटायची. हजरजबाबीपणा, कोपरखळ्या आदींनी उपस्थितांतून हशा -टाळ्यांची बरसात व्हायची त्यात कैक तास कसे निघून जायचे याचे भानही राहायचे नाही. दो हंसोका जोडा असे त्यांच्या मैत्रीचे वर्णन लोक करायचे. लातूरच्या नाना-नानी पार्कमध्ये विलासरावांचा पुतळा उभारण्याचे ठरले होते. स्थायीच्या विषयपत्रिकेवरही तो विषय होता. सोमवारी बैठक सुरू होती विलासरावांच्या पुतळ्यासंदर्भात विषय चर्चेला आला.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजा मणियार यांनी विलासरावांच्या पुतळ्यासोबत गोपीनाथरावांचाही पुतळा उभारावा असे सुचवले. काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे व रविशंकर जाधव यांनी त्यास अनुमोदन दिले. भाजपचे नगरसेवक शैलेश गोजमगुंडे व शैलेश स्वामी विषयाला मंजुरी द्यावी अशी विनंती केली. सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी तत्त्वता मान्यता दिली. शैलेश गोजमगुंडे यांनी या नेत्यांचे पुतळे एकत्र उभारावेत असे सुचवले.