Sun, Mar 24, 2019 06:39होमपेज › Marathwada › नथुरामचे मंदीर खुशाल बांधा : तुषार गांधी

नथुरामचे मंदीर खुशाल बांधा : तुषार गांधी

Published On: Feb 26 2018 6:31PM | Last Updated: Feb 26 2018 6:31PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुनी नथुरामचे मंदीर खुशाल बांधा. यामुळे या मंदिरात जाण्याअगोदर राजघाटावर दर्शनासाठी जाणार्‍यांचे चेहरे तरी समोर येतील अशी टीका ज्येष्ठ  विचारवंत व महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केली.

माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. पालिकेच्या नाट्यगृहात हे व्याख्यान झाले. माजी नगराध्यक्ष पाटील, पालिकेचे विरोधी पक्षनेते युवराज नळे, पंचायत सभापती बालाजी गावडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी गांधी म्हणाले, की देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होत आली तरी अजूनही महात्मा गांधींचा द्वेष का केला जातोय याचे उत्तर मिळत नाही. खिलाफत चळवळीचे निमित्त करून मुस्लिमांची बाजू बापूजींनी घेतली असा आरोप करीत एक वर्ग आजपर्यंत त्यांच्यावर टिका करीत आला आहे. हाच वर्ग लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मात्र निषेध करीत नाही.

लखनौ करार टिळकांनी केला. तरीही त्यांच्यावर हा वर्ग टिका करीत नाही, असे ते म्‍हणाले. महात्मा गांधींचा खून कसा झाला याची सविस्तर माहिती एफआयआरमधून स्पष्ट होते. तरीही काही मंडळी खोडसाळपणे आता तो वाद नव्याने उकरून काढत आहेत. एफआयआर व्यवस्थित वाचला तरी सगळी उत्तरे स्पष्टपणे मिळतात. तरीही काही मंडळी मुद्दाम नाटक करीत आहेत. यातूनच देशात दरी निर्माण केली जात आहे. जात, धर्म, आर्थिक अशा विविध पातळ्यांवर समाजात फूट पाडली जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.