Thu, May 23, 2019 04:17होमपेज › Marathwada › पहिल्याच प्रयत्नात रोहनने गाठले शिखर

पहिल्याच प्रयत्नात रोहनने गाठले शिखर

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 29 2018 11:53PMपरभणी : प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) च्या जून-2017 च्या मधील नागरी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यशस्वी उमेदवारांमध्ये परभणीच्या रोहन लक्ष्मीकांत जोशी (वय 25) याने देशपातळीवर 67 वी रँक प्राप्त केली आहे. त्याला आयएएस केडर मिळणार आहे. 

परभणी येथील रहिवासी असलेले व सध्या औरंगाबाद येथे कार्यरत सार्वजनिक बांधकाम विभागात राष्ट्रीय महामार्ग सर्कलचे अधीक्षक अभियंता लक्ष्मीकांत जोशी यांचा रोहन हा मुलगा आहे. रोहनने पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला की, सुशिक्षित आणि नोकरदार कुटुंबातून असल्याने शिक्षणात अडचणी आल्या नाहीत. शालेय शिक्षण परभणीच्या बाल विद्या मंदिर शाळेत तसेच इतर शहरांमध्ये झाल्यानंतर 11,12 वी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर 2014 मध्ये बीट्स पिलानीमधून बी.ई. (सिव्हिल) ची पदवी संपादन केली.  2016 मध्ये मुंबईच्या आयआयटीमधून एम.टेक टान्सपोर्टेशनची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.2015 मध्ये एमपीएससीद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी पदासाठी निवड झाली होती, मात्र मला सनदी अधिकारी बनून प्रशासकीय सेवेत यायचे होते, असेही त्यांनी सांगितले. 

यूपीएससीत परीक्षेत किरण सवंडकरचे यश

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 2017  मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत परभणीचा किरण सवंडकर देशात 459 वा आला असून, त्याची केंद्रीय सेवेत गट-अ पदावर निवड झाली आहे. सध्या किरण नायब तहसीलदार म्हणून देऊळगावराजा (जि.बुलडाणा) येथे कार्यरत आहे. किरणचे 10 वी पर्यंत शिक्षण परभणीत बाल विद्या मंदिर येथे झाले असून त्याने 10 वीच्या परीक्षेत बोर्डात तिसरा येण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर बारावीचे शिक्षण शाहू कॉलेज लातूर येथून पूर्ण केले असून त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विद्युत अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला. या यशाबद्ल किरणचे मित्र, शिक्षक तसेच समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.