Fri, Jul 19, 2019 07:39होमपेज › Marathwada › अवकाळीचा रब्बीला फटका

अवकाळीचा रब्बीला फटका

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 16 2018 10:49PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात  दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यातच 16 मार्च रोजी पहाटे 5 वाजल्यापासूनच सर्वदूर अवकाळी पावसाने रिपरिप सुरू झाली ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती. यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या  काढणीच्या वेळेसच पाऊस आल्याने मोठे नुकसान झाले आहे. याचा आथिर्र्क फटका मात्र बळीराजाला सहन करण्याची वेळ आली आहे. या पिकांची पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरीत आहे. 

अरबी समुद्रात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वार्‍यांमुळे गुरुवारपासून पुढील चार दिवस राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामात कापूस, तूर, हरभरा, करडई, ज्वारी, गहू आदी पिके शेतकर्‍यांनी घेतली होती. यातील कापूस या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पहिलाच हवालदिल झाला होता. यातच हरभरा, ज्वारी व गहू या पिकांची काढणी सध्या जिल्हाभरात सुरू आहे. यातच शुक्रवारी पहाटेपासूनच अवकाळी पावसाने रिपरिप सुरू केल्याने काढणी केलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले . 

सोनपेठ शहर व परिसरात रिपरिप
तालुक्यात मागील दोन दिवसांपासून आभाळ आलेले असताना शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शहर व  परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.  त्यानंतर दिवसभर अधूनमधून सोनपेठ शहर व परिसरात पावसाची रिपरिप चालू होती. यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाल. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.

बोरी  ः बोरी व परिसरात शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून पावसाची सुरुवात झाल्यानंतर हा पाऊस सायंकाळपर्यंत सुरूच होता.मागील चार वर्षांपासून शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. यावर्षी वरूणराजाने चांगली साथ दिली होती. पिकेही जोमात आली मात्र कापसावर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे त्याचे मोठे नुकसान झाले.सोयाबीन पिकाच्या उत्पनात घट झाली. शेतकरी रब्बी पिकात चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर होता,मात्र शुक्रवारी आलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.


मानवत :  गुरुवारपासून तालुक्यात आभाळ भरून आले होते.  मध्यरात्रीनंतर तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.  दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे  काढणीस आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकांसह काही शेतकर्‍यांच्या टरबूज बागांचेही नुकसान झाले. 


कौसडी  ः जिंतूर तालुक्यातील कौसडी व परिसरात 16 मार्च रोजी सकाळी आठ वाजल्यापासून पावसाची सुरुवात झाल्यानंतर सायंकाळपर्यंत त्याची रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे शेतकर्‍यांचे शेतातील  ज्वारी, गहू, हरभरा या शेतकर्‍यांच्या हातात आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. सततच्या  दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी रब्बी पिकात चांगले उत्पन्न मिळेल ही आशा बाळगत होता.  अवकाळी पावसाच्या रिपरिपीने शेतकर्‍यांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. 


पाथरी  ः  चार दिवसांपासून पाथरी तालुक्यातील ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हाताशी आलेल्या पिकांची काढण्याची लगबगीत होते. तर मजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक शेतकर्‍यांची सुगीची कामे खोळंबली आहेत. त्यात शुक्रवारी पहाटेपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने काढणीस आलेल्या गहू, हरभरा आणि ज्वारीचे  मोठे नुकसान झाले. खरीप पेरणीतील पिकांनी धोका दिला आता रब्बी हंगामात पिके साथ देतील असे वाटले होते. पण आलेल्या पिकांची अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले.


गंगाखेड : संपूर्ण तालुक्यात शुक्रवारी सकाळपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तसेच ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. या पावसाने शेतीमालासह आंब्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. तालुक्यात सकाळी सहापासूनच पावसाने हजेरी लावली. हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला.या अवकाळी पावसाने काढणीस आलेला गहू, हरभरा,ज्वारी,आंबा यास जबर फटका बसला.यापूर्वीच तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावत पिकांचे मोठे नुकसान केलेले असल्याने बळीराजा अगोदरच संकटात सापडलेला होता. शेतकर्‍यांचे पांढरे सोने बोंडअळीने फस्त केल्याने सर्व काही गहू,ज्वारी याच पिकावर बळीराजा अवलंबून होता. पण अवकाळी पाऊस शेतकर्‍यांच्या मागे लागल्याचे स्पष्ट होत आहे.शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरूच होती.