Sat, Mar 23, 2019 18:15होमपेज › Marathwada › ऐतिहासिक बंदला अभूतपूर्व प्रतिसाद

ऐतिहासिक बंदला अभूतपूर्व प्रतिसाद

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 09 2018 9:50PMहिंगोली : प्रतिनिधी

सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षणासाठी गुरूवारी पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हिंगोली शहरातसह जिल्हाभरात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करून कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी घोषीत केल्याने शहरात संचारबंदी सदृष्य परिस्थिती दिसून येत होती. शेकडो समाज बांधवांनी मुंडण आंदोलन करून शासनाच्या भुमिकेविरोधात रोष व्यक्‍त केला. आंदोलकांचे जथेच्या जथे ठाण मांडून बसले होते. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने उतरल्याच्या दिसून आल्या. रस्त्यावर एकही वाहन धावले नाही. परिवहन महामंडळाच्या बसेस आगारात लावण्यात आल्या. जिल्हाभरात शांततेत बंद पाळण्यात आला. काही अपवादात्मक घटना वगळता, समाज बांधवांनी शांततेत बंद पाळला.

हिंगोली शहरात सकाळी 7 वाजल्यापासून फेरी मारून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. तसेच अग्रेसर चौकात तब्बल एक हजार युवकांनी मुंडण आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. लाला लजपतराय नगरातील महिलांनी थेट हिगोली-वाशिम रस्त्यावर ठाण मांडून रस्ता रोखून धरला. या आंदोलनात पाचशे पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. अकोला बायपासवर मराठा बांधवांनी रास्तारोको करून जागेवर स्वयंपाक करीत जेवणाची व्यवस्था केली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत हिंगोली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही.

आखाडा बाळापूर : गुरूवारी सकाळी 7 वाजल्यापासून आखाडा बाळापूर परिसरात आंदोलनकर्त्यांनी हिंगोली-नांदेड रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन केले. यामध्ये डोंगरकडा, हिवरा फाटा, कामठा फाटा, शेवाळा, साळवा पाटी आदी ठिकाणी रास्तारोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला. या आंदोलनात परिसरातील शेकडो समाज बांधव सहभागी झाले होेते. आखाडा बाळापूर शहरात महामार्गावर रास्तारोको करून रक्‍तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबीरात सायंकाळी उशिरापर्यंत शंभरपेक्षा जास्त रक्‍तदात्यांनी रक्‍तदान केले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत रास्तारोको आंदोलन सुरूच होते. आंदोलनदरम्यान कार्यकर्त्यांना स्वंयस्फूर्तीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी आंदोलकांनी जाग्यावरच खिचडी तयार करून वाटप केली. आंदोलन दरम्यान आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर, पोलिस उपनिरीक्षक तानाजी चेरले, सविता बोधनकर यांच्यासह मोेठा फौजफाटा तैणात करण्यात आला होता. आंदोलन शांततेत पार पडले.

गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे गुरूवारी सकल मराठा समाजाच्यावतीने बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. तसेच चक्‍काजाम आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो आंदोलक सहभागी झाले होते. गोरेगाव परिसरातील जामठी, केंद्रा, माझोड, गारखेडा, सवना आदी गावातही स्वयंस्फूर्तीने बंद करून चक्‍काजाम आंदेालन करण्यात आले. आंदोलन दरम्यान गोरेगाव पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शेवाळा-बाळापूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी हजर होते.

जवळाबाजार : गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार सकाळी दहा वाजेपासूनच बसस्थानक परिसरात परभणी-हिंगोली महामार्गावर रास्ता रोको, धरणे आंदोलन गावातील मुख्य मार्गाने रॅली, व्यापार्‍यांकडून बाजारपेठ बंद, डॉक्टरांनी दवाखाना बंद ठेवत मुंडन करून सहभाग नोंदवला.

जवळाबाजार बसस्थानक परिसरात सकल मराठा समाजबांधवांनी आंदोलनात सहभाग घेवून सकाळापासून बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. व्यापार्‍यांनी आंदोलनात पाठींबा दिला तर डॉक्टरांनी आपला दवाखाना बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेत मुंडन केले. सकाळी दहा वाजता परभणी-हिंगोली मार्गावर जवळाबाजार बसस्थानकावर रास्ता रोको, ठिय्या धरणे आंदोलन करण्यात आले. अकरा वाजता गावातील मुख्य मार्गाने मराठा समाजातर्फे रॅली काढण्यात आली होती. दुपारी बारा वाजेपासून बसस्थानक परिसरात पुन्हा ठिय्या धरणे आंदोलनास सुरुवात झाली. दुपारी एक वाजता जमादार खुद्दुस व पोलिस प्रशासनातर्फे आंदोलनकर्त्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले. भजन, कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनात परिसरातील गावातील मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जमादार खुद्दुस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर महसूल विभागाचे मंडळ निरीक्षक वैजनाथ भालेराव, तलाठी आदी उपस्थित होते.

नर्सी नामदेव : येथील पोलिस ठाण्या अंतर्गत येणार्‍या खुडज, जवळा, कडती, नर्सी, केसापूर, घोटा आदी गावी दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. नर्सी पोलिस ठाण्या अंतर्गत गुरूवारी सर्वत्र बंद पाळण्यात आला. घोटा गाव बंद ठेवून हिंगोली-सेनगाव या मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन दरम्यान, हिंगोलीचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी या गावाना भेटी दिल्या. तर नर्सी पोलिस ठाण्याचे सपोनि बालासाहेब येवते यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नसल्याचे सपोनि येवते यांनी सांगितले. नर्सीसह परिसरातील गावातही कडकडीत बंद पाळून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.

पांगरा शिंदे : येथे सकाळपासून सकल मराठा ठोक क्रांती मोर्च्याच्या पदाधिकार्‍यांनी पांगरा शिंदेसह सिरळीत कडकडीत बंद पाळला. या आंदोलन दरम्यान, पांगरा शिंदे येथे सकाळी अकोला-पुर्णा ही पॅसेंजर रेल्वे आंदोलनकर्त्यांनी रोखण्यात आली. तसेच पांगरा ते वाई रोडवर काट्या टाकुन रोड पुर्ण बंद केला. तर सिरळी येथील क्रांती मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी वाई ते पांगरा शिंदे रोडवर टायर पेटवून रोड पुर्ण बंद केला. पांगरा शिंदे येथील मोर्च्यामध्ये नवयुवक व तरूणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. यावेळी ठिकठिकाणी ठिय्या देत शासन विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. बंद शांततेत झाल्याने कुठलाही गैर प्रकार घडला नाही.    

जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन असल्यामुळे वाहूतक ठप्प झाली होती. परंतु रूग्णवाहिका आल्यास आंदोलनकर्ते तात्काळ रस्ता करून देत होते. नांदेड व अकोल्याकडे जाणार्‍या चार ते पाच रूग्णवाहिकांना आंदोलनकर्त्यांनी रस्ता खुला करून सोडून दिले. तसेच त्यांची आस्थेवाईक विचारपूस करून काही अडचण असल्यास मदत देण्याचा प्रयत्नही केला. रूग्णाच्या बाबतीत मात्र सर्वांनीच संवेदनशिलता दाखविली.