परभणी : प्रतिनिधी
मराठा आरक्षण मिळावे याकरीता 9 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाने शहराकडे येत असलेल्या गंगाखेड रोड, जिंतुर रोड, पाथरी रोड, वसमत रोड इत्यादी ठिकाणी रास्तारोको केला. या दरम्यान आंदोलकांनी प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातुन महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.
जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने जनेतला शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले होते. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी घोषीत करण्यात आली होती. त्याच प्रमाणे शहरातील व्यापार्यांनी स्वतःची प्रतिष्ठाणे बंद ठेवून आंदोलनास पाठींबा दिला. सकाळपासुन ते सायंकाळपयर्ंत शहरात तुरळक दुचाकीस्वार वगळता इतर वाहने रस्त्यावर फिरकले नाहीत. दरम्यान सकल मराठा समाजातर्फे रस्त्यावर बसुन निदर्शेने करण्यात आली.
शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ गेट समोर दिवसभर ठिय्यामांडून भजन व किर्तन करण्यात आले. यात किर्तनकारांनी उपस्थित जनसमुदायास प्रबोधनात्मकरित्या मार्गदर्शन करुन मराठा आरक्षणाची मागणी संविधानिक असल्याचे पटवून दिले. यावेळी आंदोलनात सहभागी स्वयंसेवकांनी नागरिकांसाठी फराळ व पाण्याची व्यवस्था केली होती. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, पुरुष, लहान मुले सहभागी झाले होते. त्याच बरोबर जिंतूर रोड, पाथरी रोड, खानापुरफाटा, वसमतरोड आदी ठिकाणी रास्तारोको करुन आंदोलकांनी मराठा आरक्षणाची मागणी केली.
बोरी येथे शंभर टक्के बंद : येथे मराठा समाजाच्या वतीने माहाराष्ट्र बंदचे आयोजन करण्यात आले होते .या बंद ला बोरी येथे चांगला प्रतिसाद मिळाला. मागील दोन वर्षांपासून मराठा समाजातील विविध संघटना एकत्र येऊन वेगवेगळ्या पद्धतीने समाजाच्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत मात्र एवढा वेळ जाऊनही राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने पुन्हा एकदा मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे याच अंतर्गत बोरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने 09 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद ठेऊन चक्का जाम आंदोलन करण्यात आले व सकाळी 11 वाजल्यापासून बोरी येथील माहादेव मंदिराच्या परिसरात मराठा समाजातील व इतर समाजातील , सर्व पक्षीय नागरिकांनी सहभागी होऊन भजन व केस मुढण करण्यात आले. या मध्ये 51 जणांनी मुढण करुन. कापलेले केस अधिकार्यांमार्फत सरकारला दिले. इतर समाजांनीही पाठींबा दिला.