होमपेज › Marathwada › अनधिकृत पार्किंगमध्ये अडकला सुभाषरोड 

अनधिकृत पार्किंगमध्ये अडकला सुभाषरोड 

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 10:38PMबीड : प्रतिनिधी

बीड शहरातील महत्त्वाचा असलेला सुभाष रोड गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वाहनांसाठी पार्किंगचा अड्डा बनला आहे. दुचाकीचालक किंवा पादचार्‍यांनी येथे वाहन लावू नका असे म्हटल्यावर  वाहनमालक फुकट फौजदारी करत दुसर्‍यांवरच रुबाब गाजवितात. या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाकडूनही कारवाई होत नसल्याने दिवसभर या रस्त्यावर ट्रॅफिकजामचा त्रास सहन करावा लागत आहे.बीड शहरातील मुख्य मार्केट सुभाष रोडवर आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा पूर्ण रस्ता मार्केटचा असून बीडकरांच्या रहदारीचाही हा मुख्य मार्ग आहे. आधीच रस्ता अरुंद झाल्याने व रस्त्यावर खड्डे पडल्याने सिमेंट काँक्रेटचा करण्यात येत आहे. शहर पोलिस चौकी ते साठे पुतळा येथपर्यंत प्रशस्त रस्ता झाला आहे. 

रस्ता प्रशस्त झाल्याने आता रहदारी सुरळीत होईल, अशी आशा बीडकरांना होती, मात्र अल्पावधीत या आशेवर पाणी पडले आहे. सुभाष रोडवर सकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत व्हीआयपी गाड्या रस्त्याच्या मधोमध लावण्यात येत आहे. अशा गाड्या लावल्याने आता दुचाकीचालकही आपल्या गाड्या रस्त्याच्या बाजुला उभ्या करीत आहेत. या रस्त्यावर गाड्याच गाड्या होत असल्याने पायी चालणेही कठीण होऊन जात आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने या रस्त्यावर कापड, सोने-चांदी, इलेक्ट्रिक साहित्य आदी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी असते. अशावेळी सातत्याने ट्रॅफिक जाम होत आहे. याचा व्यापार्‍यांसह पादचारी, दुचाकीचालक यांना त्रास होत आहे.  येथून अनेकदा पोलिस ये-जा करतात, मात्र नो पाकिर्ंंगमध्ये व्हीआयपी गाड्या असल्याने तेही पाहून न पाहिल्यासारखे करीत आहेत. यामुळे अशा वाहन धारकांकडून नियमांना हरताळ फासला जात आहे. या रस्त्यावर नो पार्किंगमध्ये गाड्या लावू न देण्याची मागणी होत आहे. 

Tags : Marathwada, unauthorized, parking,  Subhash, road