होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : उमरगा येथे धाडसी चोरी, १ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल लंपास

उस्मानाबाद : उमरगा येथे धाडसी चोरी, १ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल लंपास

Published On: Jun 27 2018 10:00PM | Last Updated: Jun 27 2018 9:58PMउमरगा : प्रतिनिधी

शहरातील सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अशोक चौकातील मोबाईलचे दुकान अज्ञात चोरटय़ांनी फोडून १ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल लंपास केली. ही घटना बुधवारी, दि. २७ रोजी पहाटेच्या सुमारास तर त्याच दिवशी तालुक्यातील बलसूर (जि. उस्मानाबाद) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम अज्ञात चोरट्यानी फोडण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वर्दळीच्या ठिकाणचे मोबाईल दुकान व एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकात भीतीची वातावरण पसरले आहे तर चोरट्यांनी पोलिसांना तपासाचे आव्हान दिले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील अशोक चौकात राहुल येळापूरे यांचे रोहित मोबाईल नावाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दुकान कुलूपबंद करून घराकडे गेले.

बुधवार दि. २७ रोजी सकाळी येळापुरे यांच्या दुकाना शेजारील दुकानदाराने मोबाईल दुकानाचे शटरचे लॉक तुटले असल्याची माहिती दिली. येळापूरे यांनी दुकानात येऊन पाहणी केली असता दुकानाच्या शटरचे लॉक गॅस कटरने कट करून दुकानातील १ लाख ३९ हजार ३९१ रुपये किंमतीचे १२ मोबाईलचे नविन हॅन्डसेट तसेच इतरही काही हॅन्डसेट चोरीला गेले. ( त्यांची किंमत कळु शकली नाही.) 
याप्रकरणी राहुल येळापूरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसात अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास सपोनि मंजुषा सानप या करीत आहेत तर दुसर्‍या एका घटनेत तालुक्यातील बलसूर येथ छत्रपती शिवाजी चौकात एसबीआय शाखेचे एटीएम असून गेल्या अनेक दिवसापासून चलन तुटवड्या अभावी बंद असलेल्या एटीएममध्ये दोन दिवसापूर्वी रक्कम टाकण्यात आली होती.

बुधवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी शटर गॅस कटरने कट करून आत प्रवेश केला, मात्र एटीएम फोडण्यात अयशस्वी ठरल्याने अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. बलसूर येथे गेल्या चार वर्षांपासून एटीएमची सुविधा उपलब्ध असून परिसरातील हे एकमेव एटीएम असल्याने सतत गर्दी असते. सोमवारी संबंधित एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये रक्कम भरली होती. बुधवारी पहाटे अज्ञात तीन चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच हत्यारे, लोखंडी साहित्य टाकून चोरटे प्रसार झाले. हा प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असला तरी चोरट्यांनी तोंडावर कपडा बांधल्याने ओळख होवू शकली नाही. याप्रकरणी बार्शी येथील इलेक्ट्रॉनिक पेमेंट अॅड सर्व्हिसेस या कंपनीचे मॅनेजर प्रशांत दत्तात्रय मेंडापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ांविरूध्द उमरगा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून याचा पुढील तपास पोहेकॉ संजय शिंदे करीत आहेत.
                  
उमरगा शहरातील मोबाईल दुकानाच्या शटरचे लॉक व दोन तासाच्या फरकाने बलसूर येथील एटीएमच्या शटरचे लॉक गॅस कटरने कट केल्याच्यी घटना व  दोन्ही घटनास्थळावर सापडलेली हत्यारेसारखी असल्याने चोरटे एकच असल्याची चर्चा सुरू होती.