Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Marathwada › भरधाव मोटारसायकलच्या धडकेत मायलेकी गंभीर जखमी

भरधाव मोटारसायकलच्या धडकेत मायलेकी गंभीर जखमी

Published On: Feb 03 2018 12:53PM | Last Updated: Feb 03 2018 12:50PMअंबासाखर : प्रतिनिधी 

रस्त्यावरून चालत निघालेल्या मायलेकीस भरधाव मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत दोघी गंभीर जखमी झाल्या. अंबाजोगाई लोखंडी सावरगाव रोडवरील कृषी महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. या दोघींवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शालिनी राजेंद्र बत्तीशे (वय - ३२ रा. मोरेवाडी ) आणि त्यांची मुलगी प्रियांका (वय १२) हिला घेवून काही कामानिमित्य बाहेर आल्या होत्या. कृषी महाविद्यालय समोरील रस्त्यावर चालत असतानाच त्यांना भरधाव वेगात असणाऱ्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. या धडकेत या दोघी मायलेकींच्या डोक्याला गंभीर इजा होवून त्या जागेवरच बेशुध्द झाल्या. यावेळी तेथे असणाऱ्या काही युवकांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघीवर लातूर येथील रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या अपघातात दुचाकीस्वारापैकी एकजण जखमी झाला असून, दुसऱ्याने घटनास्थळावरूनच पलायन केले. पोलिसांनी सदर नंबर नसलेली दुचाकी जप्त केली असून पुढील तपास सुरु आहे.