Wed, Nov 21, 2018 01:09



होमपेज › Marathwada › नांदेड : सिताखांडी तलावात बुडून दोघांचा मृत्यू 

नांदेड : सिताखांडी तलावात बुडून दोघांचा मृत्यू 

Published On: May 26 2018 6:43PM | Last Updated: May 26 2018 6:42PM



नांदेडः प्रतिनिधी

नांदेड (ता.भोकर) तालुक्यातील वाकद शिवारातील सिताखांडी तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वाकत गावावर शोककळा पसरली आहे. 

वाकत शिवारातील गट क्र. ७९ मधील आपल्या शेतात विठ्ठल मारोती मांजळकर (५०) हे आपला मुलगा शिवाजी व गावातील गोविंद ग्यानोबा वाकतकर (१५) यांच्या सोबत शेनखत टाकण्यासाठी सकाळी गेले होते. शेनखत टाकल्यानंतर गोविंद व शिवाजी हे दोघे शेताजवळील सिताखांडी तलावात हात पाय धुण्यासाठी उतरले. त्यावेळी गोविंद पाय घसरून पाण्यात पडला. 

पाण्यात बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या शिवाजी यांनी आरडाओरडा केला. त्यास वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या विठ्ठल मांजळकर यांनी प्रयत्न केला परंतु यात त्यांना यश आले नाही व गोविंद वाकदकर या बालकासह विठ्ठल मारोती मांजळकर हे दोघेही पाण्यात बुडाल्याने दोघांचाही यात मृत्यू झाला. याघटनेची माहिती शिवाजी याने गावात जावून दिल्यानंतर गावातील लोक घटनास्थळी धावून आले. 

घटनेची माहिती मिळताच पोहेकॉ उमेश कारामुंगे व  पोलिस कर्मचारी एस.के.कंधारे यांनी पंचनामा करुन भोकर पोलिसात  आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या दुर्दैवी घटनेने वाकद गावावर शोककळा पसरली होती. मयत गोविंद ग्यानोबा वाकतकर हा सिताखांडी येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळेत आठव्या वर्गात शिक्षण घेत होता. दुसरे मयत शेतकरी विठ्ठल मारोती मांजळकर यांच्यावर कुटुंबाची बिस्त होती, त्यांच्या पश्चात पत्नी, ४ मुली, २ मुले असा परिवार आहे.