Tue, Apr 23, 2019 07:35होमपेज › Marathwada ›  बापुजींच्या स्वप्नातील राष्ट्र भ्रष्ट होत आहे : तुषार गांधी 

 बापुजींच्या स्वप्नातील राष्ट्र भ्रष्ट होत आहे : तुषार गांधी 

Published On: Feb 12 2018 9:52PM | Last Updated: Feb 12 2018 9:52PMअंबाजोगाई :  प्रतिनिधी

महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील राष्ट्र भ्रष्ट होत आहे. राष्ट्रातील संस्कृती संपत चालली आहे. देशात धर्म जातीच्या नावावर अराजकता वाढत आहे. गांधीच्या विचारांच्या  आरशात पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. असे मत महात्मा गांधींचे पणतु व लेटस् किल गांधी या ग्रंथाचे लेखक तुषार गांधी यांनी व्यक्त केले. ते अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय संचलीत व विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत महात्मा गांधी अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे होते. यावेळी  संस्था पदाधिकारी जेष्ठ सल्लागार अॅड. व्ही. के.चौसाळकर, कार्यकारी उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव कराड, सचिव अॅड. उदयकुमार कामखेडकर, सहसचिव माणिक लोमटे, गणपत व्यास गुरूजी, जेष्ठ पत्रकार अमर  हबीब यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना गांधी म्हणाले, ‘‘गांधीजींनी दलितांना  हक्क मिळवून देण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले. गांधीजींसह सर्व महापुरूषांना व्यक्ती म्हणून नाही तर, तत्वाने ओळखलं पाहिजे. गांधीचे हिंदु मुस्लिम ऐक्य हे ब्रीद होते. अहिंसा, शांती व प्रेम संस्कृतीचा पाया आहे. ऐक्य ही काळाची गरज आहे. राष्ट्राची परिभाषा समजून घ्यायला हवी. गांधीची खेड्यांना देशाचे हृदय समजत होते. परंतु, आज खेडेगावं उजाड झाल्याचं दिसतं आहे. तरूणांना रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते आहे.’’

दांभिक गांधी भक्तीमुळे आज गांधी विचारांना धोका निर्माण झाला आहे. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश खुरसाळे म्हणाले, ‘‘गांधीजींचे विचार प्रत्यक्षात उतरवले पाहिजेत. जाती व धर्म आधारावर राष्ट्र मोठे होऊ शकत नाही.गांधीजींचे विचार व कार्य जगाने मान्य केले आहेत.ऐक्य निर्माण करण्यासाठी गांधीचे योगदान मोठे होते.’’