Tue, Apr 23, 2019 05:41होमपेज › Marathwada › चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजापूरमध्ये गर्दी

चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजापूरमध्ये गर्दी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तुळजापूर : प्रतिनिधी

शनिवार, दि. 31 रोजी होत असलेल्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त तुळजाईनगरीत भाविकांचा अलोट जनसागर दाखल झाला आहे. ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽ’च्या गजरात हजारो भाविक, भक्तांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या अलौकिक रूपाचे भक्तिभावाने दर्शन घेतले.

चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त मागील तीन-चार दिवसांपासून तुळजापुरात देवीदर्शनासाठी भक्तांचा ओघ सुरू आहे. शुक्रवार, दि. 30 रोजी सकाळपासूनच भाविकांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी हजारो देवीभक्त तुळजापुरात दाखल झाले होते.

शनिवारी पहाटे 1 वा. महंत तुकोजीबुवा यांनी मंदिर उघडल्यानंतर देवीची चरणतीर्थ पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
सकाळी 6 वा. अभिषेकाचा घाट होऊन देवीच्या अभिषेक पूजेस सुरुवात करण्यात आली. पंचामृत अभिषेक पूजा विधीनंतर देवीस वस्त्र अलंकार नेसवून धुपारती करण्यात येऊन अंगारा काढण्यात आला.

तुळजाभवानी देवीच्या प्रमुख उत्सवापैकी एक असलेल्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त मागील तीन दिवसांत भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली असून याकालावधीत सुमारे दोन लाखांच्यावर भक्तांनी देवीदर्शनाचा लाभ घेतला. 

तुळजापुरातून दर्शन घेऊन अनेक भाविक येरमाळा येथील येडेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी रवाना होतात. त्यानुसार तुळजापूर बसस्थानकातून येरमाळा येथे जाण्यासाठी जादा बसेसची सोय राज्य परिवहन महामंडळाने केली आहे.


  •