Tue, Nov 19, 2019 10:14होमपेज › Marathwada › तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा

तुळजाभवानी मातेची मुरली अलंकार महापूजा

Published On: Dec 29 2017 5:31PM | Last Updated: Dec 29 2017 5:30PM

बुकमार्क करा
तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र महोत्सवात चौथ्या माळेला तुळजाभवानी मातेची रथअलंकार महापूजा मांडण्यात आली. हजारो भाविकांनी भक्तीभावाने देवीचे मुरली अलंकार महापूजा रुपातील श्रीकृष्ण रुपाचे दर्शन घेतले. शुक्रवार हा देवीचा वार असल्याने भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

शुक्रवारी सकाळी महंत तुकोजीबुवा यांच्याकडून पूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.

सकाळी सहा वाजता पूजेची घाट झाल्यानंतर देवीच्या पंचामृत अभिषेक पूजेस प्रारंभ झाला. यावेळी महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी तुषार कदम, शशी परमेश्वर, अतुल मलबा,संजय सोंजी, दिनेश परमेश्वर, रुपेश कदम, विशाल सोंजी यांची उपस्थिती होती. अभिषेक संपन्न झाल्यानंतर धुपारती होऊन अंगारा काढण्यात आला.

शुक्रवार दि. २९ रोजी तुळजाभवानीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. देवीस या अलंकार महापूजेत श्रीकृष्ण रुपात सजवले जाते. यात देवीने मुकुटावर मयूरपंख धारण केला असून हातांमध्ये चांदीची मुरली घेतली आहे, अशी मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. यावेळी देवीला प्राचिन, पारंपरिक अनमोल दागदागिन्यांनी मढवण्यात आले. माणिक जडवलेले सुवर्ण नेत्र, नाकात मौल्यवान नथ, भाळावर चंदनगंधांचा लेप असून त्यावर वैष्णव गंध रेखाटण्यात आला. अमूल्य हिरे, माणिक, पाचू जडवलेला मुकुट, गळ्यात रत्नहार, सुवर्ण पुतळ्यांच्या माळा, मोतीमाळ परिधान केलेले देवीचे मनमोही श्रीकृष्णरूप खुलून दिसत होते. हजारो भाविक भक्तांनी देवीच्या या मुरली अलंकार महापूजेचे भक्तीभावाने दर्शन घेतले.