Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Marathwada › लागवड जोमात; संवर्धन कोमात

लागवड जोमात; संवर्धन कोमात

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 19 2018 11:05PMगेवराई : विनोद नरसाळे

येथील सामाजिक वनीकरण या विभागाअंतर्गत शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वृक्ष लागवड जोमात होत असली तरी त्या वृक्षांचे संवर्धन होत नसल्याचे समोर आले आहे. या विभागामार्फत चालविण्यात येणार्‍या नर्सरी मध्ये देखील भ्रष्टाचाराचे पाणी मुरत आहे. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.

महाराष्ट्र शासनाने हरित महाराष्ट्रासाठी आणि जमिनीची होणारी धूप थांबवण्यासाठी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. जागतिक तापमानामध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत गांभीर्याने घेत महाराष्ट्र शासनाच्या गत दोन-तीन वर्षांपासून शासनाचे विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवत आहे. या मोहीम अंतर्गत गेवराई सामाजिक वनीकरण विभागाला देखील वृक्ष लागवड उद्दिष्ट देण्यात आले होते, दरम्यान केवळ उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली, मात्र यानंतर या झाडांचे संगोपन न करताच शासनाचा निधी हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. गतवर्षी जळालेल्या झाडांच्या खड्ड्यातच यावर्षी नवीन वृक्ष लागवड करण्याचा प्रताप येथील सामाजिक वनीकरण विभागाने केला आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संवर्धनाची योजना नसल्याचे समोर आले आहे.

फलकाचा निधी हडप

ज्याठिकाणी कामे करण्यात आली आहेत अशा ठिकाणी फलक लाऊन त्यावरती योजना, सदरील कामावर किती निधी खर्च होत आहे, कालावधी याचा तपशील लावणे गरजेचे आहे, मात्र फलक लावल्यास लोकांना माहिती होईल व आपले पितळ उघडे पडेल यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यात एकाही फलक लावलेला नसून या फलकाचा देखील निधी हडप केला आहे.