Sun, Mar 24, 2019 08:59होमपेज › Marathwada › परभणी शहरातील वाहतुकीचे तीनतेरा

परभणी शहरातील वाहतुकीचे तीनतेरा

Published On: Jun 26 2018 9:55PM | Last Updated: Jun 26 2018 9:36PMपरभणी : प्रतिनिधी

पोलिसांनी वाहनधारकांवर कारवाईचे हत्यार उपसले आहे. 20 जूनपासून शहरात वाहनांची तपासणी मोहीम सुरू झाली आहे. वाहनधारकांकडून अवास्तव दंड वसूल केला जात आहे. वाहतुकीची कोंडी अन् रस्त्यावरच थाटलेली दुकाने दिवसें-दिवस वाहतुकीतील प्रमुख अडथळा ठरत आहेत, परंतु असे असतानाही  शहर वाहतूक शाखा या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. 

वाहतुकीच्या नियमांसंदर्भात काटेकोरपणे स्वतः कर्मचार्‍यांनी  पालन करायला हवे. वाहतुकीस नियंत्रित ठेवण्यासाठी चौकात थांबून वाहतूक नियमन करणे, वाहनधारकांचे समुपदेशन करणे, नियमांचे उल्लंघन करणार्‍यास रस्त्याच्या बाजूला थांबवून त्याच्यावर नियमानुसार कारवाई करायला हवी. मात्र परभणीच्या शहर वाहतूक शाखेकडून तसे होताना दिसत नाही. यामुळे वाहनधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वाहनधारक शिस्तप्रियतेचे पुरस्कर्ते आहेत, परंतु वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांच्या मनमानीमुळे त्यांच्यात असंतोष निर्माण होत आहे. 

वाहतूक शाखेच्या दंड आकारणी मोहिमेवर नागरिक नाराज आहेत. जाणिवपूर्वक केली जात असलेली दंडात्मक कारवाई ही अन्यायकारक बाब असल्याची खंत वाहनधारक व्यक्‍त करीत आहेत, परंतु या मोहिमेचा गैरफायदा घेत वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसेल त्या वाहनास अडवून भोळ्या-भाबड्या वाहनधारकांकडून अवास्तव दंड वसूल करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील वाहनधारक शहरात फिरकत नसून, पोलिसांच्या दडपशाहीला लोक कंटाळत असल्याची वस्तुस्थिती शहरात दिसत आहे. यामुळे वाहतूक शाखेकडून परभणीरांच्या अपेक्षाभंग होत आहेत. नवीन अधिकारी आला की नवीन नियम, वसुली बंद होईल हीच अपेक्षा नागरिकांची होती, परंतु तसे न होता अधिक दंड आकारणीमुळे नियुक्‍त वाहतूक शाखेच्या अतिरिक्‍त दंड आकारणी करणार्‍या पोलिसांचे मनोबल वाढले आहे. परंतु या प्रकारामुळे ग्रामीण भागातून येणार्‍या वाहनधाकरांना पोलिसांची धडकी भरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

यामुळे प्रशासनाने यासंदर्भात वेळीच हस्तक्षेप करून वाहतूक शाखेकडून शहरातील वाहतुकीच्या कोंडी व रस्त्यावरील वाहनांची कारवाई करून आवश्यक त्याच वाहनांची तपासणी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.