होमपेज › Marathwada › नांदेड : ट्रॅक्‍टर उलटून २ मजूर ठार, ८ जखमी

नांदेड : ट्रॅक्‍टर उलटून २ मजूर ठार, ८ जखमी

Published On: Dec 30 2017 5:10PM | Last Updated: Dec 30 2017 5:10PM

बुकमार्क करा
नायगाव बाजार : प्रतिनिधी

घुंगराळा येथील विद्युत वाहिनीच्या मनोर्‍याच्या कामासाठी मजूर घेऊन निघालेल्या ट्रॅक्‍टरला कृष्‍णूरजवळ अपघात झाला. यात पश्चिम बंगालमधील दोन मजूर ठार झाले तर अन्य ८ जण जखमी आहेत. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नायगांव नांदेड महामार्गावर ही घटना घडली. 

कृष्‍णूर औद्योगिक वसाहतीसाठी घुंगराळा येथे २२० के.व्‍ही.च्या विद्युत केंद्राचे काम सुरू आहे. या ठिकाणी मनोरे उभारण्याचे काम पुण्याच्या जारंडे इंजिनिअरिंग या कांचन पानपटे यांच्या कंपनीला मिळाले आहे. ठेकदाराने या कामासाठी पश्चिम बंगालमधील कामगार आणले होते. हे कामगार कामाच्या ठिकाणीच राहत होते. तेथून ते ट्रॅक्‍टरमधून मनोर्‍याच्या ठिकाणी जात होते. 

आज सकाळी कहाळघ ते कोलंबी येथील मनोर्‍याचे काम करण्यासाठी २० ते २२ कामगार, लोखंडी पोल व साहित्यासह ट्रॅक्‍टरमधून जात होते. यावेळी क्षमतेपेक्षा अधिक साहित्य झाल्याने चालकाचा ताबा सुटून कृष्‍णूरजवळील रामदेव ढाब्याजवळ ट्रॅक्‍टर उलटला. यात इब्राहिम मकबूल महम्‍मद (२५) व रोहूल शमशोद्दिन (२०) हे दोघे जागीच ठार झाले. इतर ८ जण जखमी झाले आहेत. पैकी चौघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हालवण्यात आले आहे. तर इतरांवर नायगावच्या ग्रामीण रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. 

मृत व जखमी सर्वजण पश्चिम बंगालमधील मालदा जिल्‍ह्यातील मनपूरचे रहिवासी आहेत. या अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. अपघातानंतर ट्रॅक्‍टर चालक फरारी झाला आहे. पोलिस तपास करीत आहेत.