Tue, Apr 23, 2019 09:52होमपेज › Marathwada › वडवणीचे तूर खरेदी केंद्र पुन्हा बंद

वडवणीचे तूर खरेदी केंद्र पुन्हा बंद

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:38AM बीड : प्रतिनिधी

वडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्रावरील रिकामा बारदाना पुन्हा संपला आहे. त्यामुळे सोमवार (दि.30) पासून तूर खरेदी केंद्र पुन्हा एकदा बंद पडले आहे. याप्रकाराने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वडवणी येथील शासकीय तूर खरेदी केंद्र रिकाम्या बारदान्या अभावी वारंवार पडत आहे. या वर्षी चार वेळा बारदाना संपल्यावर केंद्र बंद पडले होते. अठरा एप्रिल रोजी शासकीय मुदत संपल्यामुळे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील सर्व शासकीय तूर खरेदी केंद्रे बंद करण्यात आले होते. त्यानंतर दैनिक पुढारीने वारंवार पाठपुरावा करून हजारो शेतकर्‍यांची तूर अजूनही घरात पडून असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर 26 एप्रिल पासून पुन्हा तूर खरेदी चालू करण्यात आली. शेतकर्‍यांनी गर्दी करून तूर खरेदी केंद्रावर आणली. गुरुवार ते शनिवार हे तीन दिवस खरेदी केंद्र सुरळीत सुरू होते, मात्र शनिवारी दुपारी तूर भरण्यासाठी आवश्यक असणारा रिकामा बारदाना संपला. त्यामुळे सोमवारी तूर खरेदी केंद्र सुरू झालेच नाही. सोमवारी काही शेतकरी तूर खरेदी केंद्रावर आले होते, परंतु त्यांना परत जावे लागले. जो पर्यंत रिकामा बारदाना उपलब्ध होत नाही तो पर्यंत केंद्र सुरू होणार नसल्याचे चित्र आहे. गेल्या वेळी रिकामा बारदाना उपलब्ध नसल्याने सुमारे पंधरा दिवस केंद्र बंद पडले होते. यावेळी रिकामा बारदाना उपलब्ध होण्यासाठी किती दिवस लागतील असा सवाल उपस्थित होत आहे. वडवणी तालुक्यातील आर्ध्या शेतकर्‍यांना तूर खरेदी केंद्रावर आणण्यासाठी अजूनही मेसेज पाठविण्यात आलेले नाहीत. या शेतकर्‍यांच्या तुरीचे मापे कसे होतील, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.