Wed, Jan 23, 2019 02:20होमपेज › Marathwada › पावसातही पेडगावात चोरट्यांचा धुमाकूळ; मारहाणीत पती-पत्नी जखमी

पावसातही पेडगावात चोरट्यांचा धुमाकूळ; मारहाणीत पती-पत्नी जखमी

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:29AMपरभणी : प्रतिनिधी

पाऊस पडत असल्याचा फायदा घेऊन घरात घुसून वृद्ध पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला करून 50 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास पेडगाव येथील आंनद नगर भागात घडली.शेख महंमद शेख सुलतान (65 वर्षे, रा. पेडगाव) व त्यांची पत्नी आरेफा बी शेख महंमद (वय 60) असे जखमी पती-पत्नीचे नाव आहे. लाकूडकाम, शेतमजुरी करत असलेले हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे 16 ऑगस्ट रोजी रात्री आपल्या घरात झोपले होते. दरम्यान 17 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री 2.30 वजण्याच्या सुमारास 5 ते 6 जणांनी तोंडाला पट्ट्या बांधून घरात प्रवेश केला. विचारपूस न करता त्यांनी या दोघांना बेदम मारहाण करणे सुरू केले. घरातील 25 हजार रोख रक्‍कम व 25 हजारांच्या किमतीची दागिने घेऊन त्यांनी पळ काढला. याचवेळी त्यातील एकाने जाताना शेख महंमद यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. हा वार त्यांनी चुकविल्याने तो कानावर लागून काही भाग तुटला.

पाऊस असल्याने आजूबाजूला असलेल्यांना आवाज गेला नाही. यामुळे या पती-पत्नीच्या मदतीस कोणी धावून येऊ शकले नाहीत. सकाळी 7 वाजता रक्तबंबाळ झालेल्या या दाम्पत्याने स्वतः झालेला प्रकार सर्वांना सांगितला. सकाळी 8 वाजता त्यांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उदय सावंत, बिट जमादार युसूफ खान, राजेश पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी जवाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.