Wed, Jun 26, 2019 23:52होमपेज › Marathwada › हिंगोलीत तीन तलाक विरोधात मुस्लिम महिलांचा मोर्चा

हिंगोलीत तीन तलाक विरोधात मुस्लिम महिलांचा मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

हिंगोली : प्रतिनिधी

केंद्र शासनाने मुस्लिम महिला संरक्षण व विवाहाच्या अधिकारासंदर्भात २०१७ मध्ये लोकसभेत पारीत केलेले विधेयक संविधान विरोधी असून ते तात्काळ रद्द करावे या मागणीसाठी सोमवारी मुस्लिम समाजातील महिलांनी हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांच्या हातात विविध मागण्यांचे फलक झळकत होते.

केंद्र शासनाने लोकसभेत तीन तलाक विरोधात कायदा मंजूर केला. या कायद्याविरोधात मुस्लिम समाजातील महिलांमध्ये तीव्र संताप आहे. कायदा करताना मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना, धर्म पंडीतांना विचारात न घेता तो पारित केला. हा कायदा संविधानविरोधी तसेच मुस्लिम महिलांच्या विरोधी असल्याचा आरोप करीत सोमवारी हिंगोलीतील मुस्लिम महिलांना औंढा रस्त्यावरील इदगाह मैदानावरून मोर्चा काढला. हा मोर्चा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी मोर्चाच्या माध्यमातून शरियत विषयी आपली आत्मीयता व्यक्‍त केली. दुपारी दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेची सुरूवात कुराण पठणाने करण्यात आली. यावेळी फातेमा निसा बाजी यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, मुस्लिम महिलांवर हा कायदा लादण्यात येत आहे. हा कायदा रद्द करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शरियत आमच्या जिवापेक्षा जास्त प्रिय आहे. आम्ही शरियतसाठी बलिदान देऊ यामध्ये हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही महिलांनी दिली. मोर्चा दरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुस्लिम महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना मागण्यांचे निवेदन देवून कायदा रद्द करण्याची मागणी केली.


  •