Wed, Apr 24, 2019 16:32होमपेज › Marathwada › उस्मानाबादमध्ये जन्मल्या तिळ्या, मुलींसह आई ठणठणीत

उस्मानाबादमध्ये जन्मल्या तिळ्या, मुलींसह आई ठणठणीत

Published On: Aug 23 2018 8:21PM | Last Updated: Aug 23 2018 8:40PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

उस्मानाबादमधील बावी येथील महिलेने तिळ्यांना जन्म दिला आहे. या तिन्ही मुलींची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. शहरातील डॉ. अनुराधा गरड यांनी शस्त्रक्रिया केली. मजुरी काम करणार्‍या आडे दांपत्याला आता पाच मुली झाल्या आहेत.

डॉ. गरड यांनी सांगितले, की त्यांच्या गरड हॉस्पिटलमध्ये निलम महादेव आडे (वय ३५, रा. बावी, ता. उस्मानाबाद) तपासणीसाठी आल्या होत्या. तेव्हा त्या १७ आठवड्याच्या गर्भवती होत्या. त्यांना तिळे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर तेव्हापासून उपचार सुरु होते. साधारणपणे एक गर्भ असेल तर ३७ आठवड्यांनी प्रसुती होते. जुळा गर्भ असेल तर ३५ आठवड्यांनी व तिळे असेल तर ३० आठवड्यानंतर प्रसुती होण्याची शक्यता असते. या प्रकरणातही नीलम यांना तीस आठवडे पूर्ण झाल्यानंतर वेदना सुरु झाल्या. त्यानंतर डॉ. गरड यांनी तपासणी करुन सीझेरियनचा निर्णय घेतला.

या शस्त्रक्रियेनंतर तिन्ही जुळ्या मुली जन्माला आल्या. या तिघींचेही वजन प्रत्येकी एक किलो आहे. या तिन्ही मुलींवर सध्या बालरुग्णालयात उपचार सुरु आहेत. मातेसह तिन्हीही मुलींची तब्येत ठणठणीत असल्याचे डॉ. गरड यांनी सांगितले. डॉ. गरड यांना भूलतज्ज्ञ डॉ. अजय पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली डंबळ, डॉ. मिणीयार आदींनी सहकार्य केले.