Tue, Nov 20, 2018 17:52होमपेज › Marathwada › अंबाजोगाईत चोरट्यांनी न्यायालयच फोडले

अंबाजोगाईत चोरट्यांनी न्यायालयच फोडले

Published On: Feb 08 2018 12:51PM | Last Updated: Feb 08 2018 12:51PMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

येथील जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूम अज्ञात चोरट्यांनी बुधवारी  रात्रीच्या सुमारास फोडली. चोरट्यांनी थेट न्यायालयात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँग रूममधे तीन न्यायालयातील मुद्देमाल ठेवला जातो. काल रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी न्यायालय अधीक्षक कार्यालयाच्या खिडकीचे दोन गज कापून आत प्रवेश केला. नंतर आतील स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून आतील कपाटातून मुद्देमालाच्या तीन पेट्या लंपास केल्या. 

या पेट्यात काही रोख रक्कम आणि ठेवींच्या पावत्या असल्याचे समजते. सकाळी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस निरीक्षक सोमनाथ गिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सध्या पंचनामा सुरू असून त्यानंतर नेमका काय आणि किती मुद्देमाल चोरी गेला याची अधिकृत माहिती कळू शकेल.

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात अंबाजोगाई शहरातील थंडावलेले चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. यावेळेस चोरट्यांनी थेट न्यायालयालाच लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे. जर न्यायालयच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.