Wed, Jul 24, 2019 08:00होमपेज › Marathwada › हिंगोली : टेंबूरदरा येथे विष टाकून मोरांची शिकार

हिंगोली : टेंबूरदरा येथे विष टाकून मोरांची शिकार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

हिंगोली : प्रतिनिधी

औंढा नागनाथ तालुक्यातील टेंबूरदरा येथे विष टाकून मोरांची शिकार केल्‍याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी केशव वाबळे  तथा सहायक वनसंरक्षक कामाजी पवार हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र औंढा यांनी घटनास्थळी धाव घेवून विष बाधीत चार मोरांसह एका आरोपीस ताब्यात घेतले. ही घटना दि.28 मार्च रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. चारही मोर मृत झाल्याची माहिती वन विभागाने दिली.

टेंबूरदरा परिसरात काही व्यक्‍ती विष टाकून मोराची शिकार करीत असल्याची माहिती बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास  वन परिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांना ग्रामस्थांनी दिली होती. यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी आपल्या इतर सहकार्‍यांसह घटनास्थळी जावून पाहणी केली असता या जागेवरच तीन विष बाधा झालेले मोर मृत पावल्याचे दिसून आले तर एक मोर जिवंत स्थितीत ताब्यात घेण्यात आला. या एका मोरावर पशू वैद्यकीय अधिकारी जामगव्हाण येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु काही कालावधीत तोही मृत पावला. या चार मोरांमध्ये तीन लांडोर व एक मोर असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. घटनास्थळावर आरोपी गोविंदा रामलखन चव्हाण रा.पिंपळदरी परिसर (वय 32 वर्ष) यास ताब्यात घेण्यात आले असून आरोपी पवन अशोक भोसले रा.सवना, सचिन भोसले रा.सवना हे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. वन परिक्षेत्र औंढा येथे आरोपीस आणले असून पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.कादरी यांनी चार मोरांचे शवविच्छेन केले. सदरील मोहिम यशस्वीतेसाठी वनपाल जी.बी.मिसाळ, एस.एस.चव्हाण, एस.बी.चोपडे, पी.ए.खरात, एम.एन.तायडे, नारायण घोंगडे, पी.व्ही.चव्हाण, छत्रपती दिपके, आर.डी.बैराने यांनी सहभाग घेतला.

वन्य प्राणी व पक्ष्यांची शिकार करणे हा वन्यजीव कायदा 1972 नुसार गुन्हा आहे. यात कमीत कमी तीन वर्ष व जास्तीत जास्त सहा वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे कुठेही वन्यप्राण्याचीं शिकार होत असल्याच्या घटना घडत असतील तर वन विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी केले आहे.


  •