Tue, Apr 23, 2019 10:10होमपेज › Marathwada › राईनपाडा घटना : प्रमुख हल्लेखोर अटकेत; २० जणांची ओळख पटली

धुळे : प्रमुख हल्लेखोर अटकेत; २० जणांना ओळखले

Published On: Jul 05 2018 2:01PM | Last Updated: Jul 05 2018 2:02PMधुळे : प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरवून झालेल्या हल्ल्यात पाच जणांना ठार मारण्यात आले होते. या प्रकरणातील आणखी २० जणांची ओळख व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून पटवण्यात आली आहे. तर धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने प्रमुख हल्लेखोर तरुणास अटक केली आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्र हादरला. परिणामी पोलिस महानिरीक्षक छोरिंग दोरजे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेत जिल्हा पोलिस अधीक्षक रामकुमार तसेच अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांना संशयित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. यानंतर २३  जणांना अटक झाली.

उर्वरित संशयित आरोपींना पकडण्यासाठी ५ पोलिस पथके तयार करण्यात आली. यातील तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिवानसिंग वसावे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे आणि तालुका पोलिस ठाण्याच्या यांच्या पथकाने व्हिडीओ क्लिपच्या आधारावर राईनपाडाचे पोलिस पाटील बागुल यांच्या मदतीने परिसरातील अन्य गावांत संशयित आरोपीची ओळख पटवली आहे. या क्लिपमध्ये `त्या` पाच जणांवर हल्ला करणारा महारु वणक्या पवार यांचे नाव स्पष्ट झाले आहे. पवार हा मूळ शेवडीपाडाचा राहणारा असून तो सावरवाडा जवळ शेतात राहतो.

पोलिस निरीक्षक वसावे  तसेच ओंकार गायकवाड,  प्रमोद ईशी, सुनील पगारे,  मांडले यांच्या पथकाने विसारवाडीच्या दुर्गम भागात कोकणीपाडा येथून महारु पवार यास अटक केली. या संशयित आरोपीच्या प्राथमिक चौकशीत आणखी सातजणांची नावे उघड झाली आहेत.