Tue, Mar 19, 2019 20:36होमपेज › Marathwada › पोलिस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांचा किलबिलाट

पोलिस ठाण्याच्या आवारात पक्ष्यांचा किलबिलाट

Published On: Mar 25 2018 1:25AM | Last Updated: Mar 25 2018 1:25AMआखाडा बाळापूर : प्रतिनिधी

आठवडाभरापासून कडाक्याचे ऊन पडत असल्यामुळे पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरदूरवर व्यवस्था नसल्याने तहानेने व्याकूळ होऊन पक्ष्याचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्याने आखाडा बाळापूर येथील मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पुढाकारातून शहरात ठिकठिकाणी मातीच्या जलपात्राचे वाटप करण्यात आले आहे. विशेष करून शासकीय रुग्णालय परिसर व पोलिस ठाण्याच्या परिसरात असलेल्या झाडाला मातीचे भांडे बांधून त्यामध्ये पाणी टाकले जात असल्याने या परिसरात पक्ष्यांचा वावर वाढला आहे.

सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. पारा 37 अंशावर पोहोचल्यामुळे शेतशिवारातील नैसर्गिक पाणवठे आटल्यामुळे पक्षी पिण्याच्या पाण्याच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. ही बाब हेरून मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने येथील शासकीय रुग्णालय व पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या झाडांना मातीचे भांडे बांधून त्यात पाणी टाकण्याचा उपक्रम सुरू केला आहे. झाडावर आसरा घेणार्‍या पक्ष्यांना जाग्यावरच पाणी मिळत असल्याने येथील पोलिस ठाण्याच्या आवारात अनेक पक्षी दाखल होत आहेत. सकाळपासून हा परिसर पक्ष्यांच्या विविध आवाजाने किलबलून जात आहे. या उपक्रमाची सुरुवात पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली. 

यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष मधुकर चेटप, सचिव माधवराव सूर्यवंशी, रामराव इंगळे, बाजीराव सवंडकर, संभाजी पंडित, राजेश्‍वर व्यवहारे, आर.के.देशमुख, पंत आहेर, प्रकाश जमदाडे आदींची उपस्थिती होती.