Tue, Jul 23, 2019 18:47होमपेज › Marathwada › हिंगोली : औंढ्याच्या गोकर्णा माळरानात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

हिंगोली : औंढ्याच्या गोकर्णा माळरानात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

Published On: Dec 07 2018 3:32PM | Last Updated: Dec 07 2018 3:32PM
हिंगोली : प्रतिनिधी

औंढा नागनाथ येथील गोकर्णाच्या माळावर एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. ७ सकाळी अकरा वाजता उघडकीस आली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने आत्महत्या काही दिवसापूर्वी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे.

औंढा नागनाथ शहरापासून तलावाजवळ असलेल्या गोकर्णाच्या माळावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता काही मजूर कामाला गेले होते. त्‍यावेळी त्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी आजूबाजूला पाहणी केली असता, झाडाला दोन मृतदेह लटकलेले आढळून आले. यावेळी झाडाखाली विषारी द्रव्‍याची बाटलीही आढळली. मजुरांनी सुरुवातीला वन विभागाच्या कर्मचार्‍यांना माहिती दिल्यानंतर कर्मचार्‍यांनी औंढा नागनाथ व हट्टा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या घटनेतील मुलीची ओळख पटली असून ती औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव येथील धृपता कुंडलिक निंबाळकर असल्याचे स्पष्ट झाले. ती शनिवारी शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. धृपता ही औंढा येथील नागनाथ विद्यालयात बारावीमध्ये शिकत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. मुलाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे औंढा पोलिसांनी सांगितले.