Mon, Aug 19, 2019 09:13होमपेज › Marathwada › जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 21 2018 12:45AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.20) दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांना पोलिसांनी कार्यालयाच्या आवारात पकडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील चार जणांनी सोसायटीच्या कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसंदर्भात आत्मदहन करण्याचा इशारा 12 फेब्रुवारी रोजी प्रशासनास दिला होता. 

धानोरा मोत्या येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अ व ब दोन चेअरमन आणि संचालक यांच्या कारभारासंदर्भात प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या. सबळ पुरावे सादर केलेले असताना देखील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. 

सोसायटीच्या पदाधिकार्‍यांच्या कारभाराला गावकरी कंटाळले आहेत. यासाठी गावातील रावण बाबाराव मोहिते, कैलास चंपतराव वाघ, मारोती देवराव मोहिते, नरहरी सीताराम मोहिते या चौघांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. 

यापैकी मारोती मोहिते, नरहरी मोहिते या दोघांना पाच लिटर रॉकेलच्या डब्यासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. थोड्या वेळाने कैलास चंपतराव वाघ, रावण मोहिते यास पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पकडून आत्मदहनापासून रोखले. या संदर्भात चुडावा पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीवरून नवा मोंढा पोलिस ठाण्याचे फौजदार राजेश मल्लपिल्लू, रफिक शेख, एन. ए. सुजलेवाड, एल. बी. पोकलवार, दीपक बोइनवाड, संतोष चाटे हे कर्मचारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात होते.   या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. 

आंदोलनकर्त्यांच्या बॅगमध्ये रॉकेलची बाटली आढळली
जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्यासाठी आलेल्या चौघांना पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळच ताब्यात घेतले. त्यातील एकाजवळ असलेल्या बॅगची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात रॉकेलची बाटली आढळल्याने ती जप्त करण्यात आल्याची माहिती फौजदार राजेश मलपिल्लू यांनी दिली. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, तसेच आपण जिल्हा उपनिबंधकांशी बोललो असून, धानोरा मोत्या येथील सोसायटीचा अहवाल मागवून घेणार आहोत. त्यासंदर्भात दोन दिवसांनंतर माहिती देण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे समाधान झालेल्या त्या चौघांनी पोलिसांकडे लेखी जवाब नोंदवून आता आम्ही आत्मदहन करणार नाही, असे लिहून घेतले.