Fri, Apr 26, 2019 01:34होमपेज › Marathwada › उसाला प्रतीक्षा कोयत्याची, तोडणी कार्यक्रमास विलंब

उसाला प्रतीक्षा कोयत्याची, तोडणी कार्यक्रमास विलंब

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 10:47PMअंबाजोगाई :  रवी मठपती 

ऊसतोड होत नसल्याकारणाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारखान्यांचा ऊसतोड प्रोग्राम दोन ते  तीन महिने उशिरा सुरू असल्याने उसाला कोयते लागत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरू असला तरी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचाच प्रोग्राम चालू आहे. उसाची तारीख निघून गेली असून आता प्रतीक्षा कोयत्याची आहे. 

ऐन उसाच्या हंगामात तालुक्यातील शेतकरी ऊस गाळपासाठी कारखान्याचे  उंबरठे झिजवत आहेत.  फेब्रुवारी महिना चालू झाला तरी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचाच सध्या प्रोगा्रम चालू आहे.  ऊस कारखान्याला घालण्यासाठी शेतकरी कारखानदारांकडे चकरा  मारत आहेत. परंतु कारखानदारांकडून केवळ भरोसा दिला जात आहे. उसाला पाणी देण्यासाठी सिंचनाच्या क्षेत्रात भरमसाठ वाढ झाली आहे. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तालुक्यातील ग्रीन बेट समजल्या जाणार्‍या क्षेत्रातील उसाच्या बळावरच अंबा सहकारी साखर कारखाना, रांजणी येथील  नॅचरल शुगर कारखाना, सारणी येथील येडेश्‍वरी शुगर कारखाना या  तीनही कारखान्यांची उभारणी झाली आहे. साखर उद्योगात आपले स्थान निर्माण करताना बहरलेली ऊस शेती अर्थकारणाला नवे बळ देत आहे. सन 2011 ती 2015 ही पाच वर्षे पावसाच्या अवर्षणामुळे दुष्काळाचा  सामना करावा लागला होता.  पावसाने शेतकर्‍यांना वेठीस धरल्याने शेतीतली सर्व गणिते बिघडली होती.दुष्काळामुळे उसाची शेती मोडीत निघाल्यात जमा होती. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले होते. त्याचप्रमाणे खरीप व रब्बी हंगामातील पिके होरपळून निघाली होती. काही शेतकर्‍यांनी मात्र अत्यंत कष्टाने ऊस शेती जोपासली होती. दुष्काळाच्या झळा सहन केल्यानंतर गेल्या दोन वर्षांत पुन्हा पावसाने जोरदार आगमन केले. मोडीत निघालेल्या फळबागा व ऊस शेती जोमाने सुरू झाली. परंतु चालू गाळप हंगामात वेळेवर ऊस जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उसाचा पूर्ण कालावधी संपला असला तरी कारखाना ऊस घेऊन जात नसल्याने शेतकरी कारखान्याचे  उंबरठे झिजवत आहेत. त्यामुळे  मोठ्या अपेक्षेने लागवड केलेला ऊस कारखान्याला घालण्यासाठी आता उसाला कोयत्याची प्रतीक्षा करावी लागत  आहे. 

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना काही तांत्रिक कारणांमुळे मध्यंतरी बंदावस्थेत होता. कारखाना सुरू होईल की नाही अशी शंका होती. त्यामुळे कारखान्याकडून उसाच्या नोंदी करता येणे शक्य झाले नाही. अखेर कारखाना सुरू झाला व आत्तापर्यंत 1 लाख 26 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. आणखी 50 ते  75 हजार मेट्रिक टन ऊस गाळप होऊ शकतो, अशी माहिती कारखान्याकडून मिळाली. त्याचप्रमाणे तालुक्यातील सारणी येथील येडेश्‍वरी शुगर कारखान्याकडून 9 हजार नोंदी करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 3 लाख 15 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.  याठिकाणी डिसेंबर महिन्याच्या प्रोग्रामनुसार ऊसतोड होत आहे. तसेच नॅचरल शुगर कारखान्याकडे 14 हजार 400 हेक्टर उसाची नोंद झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या प्रोग्रामप्रमाणे ऊसतोड सुरू आहे. आजतागायत 5 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.