Wed, Mar 27, 2019 01:59होमपेज › Marathwada › ऊस उत्पादकांची मदार नगरच्या कारखान्यावर

ऊस उत्पादकांची मदार नगरच्या कारखान्यावर

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 28 2018 12:01AMआष्टी : सचिन रानडे

चांगल्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने आष्टी तालुक्यातील शेतकर्‍यांनी यंदा ऊस लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले याचा परिणाम म्हणून तालुक्यात उसाचे क्षेत्र जवळपास दोन हजार हेक्टरवर पोहोचल्याचे चित्र आहे. त्यामुळे साहजिकच उसाचे उत्पादन वाढलेले आहे, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना येणार्‍या काळात हा ऊस जिल्ह्याच्या बाहेर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील काही कारखान्यांना पुरविल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. कारण तालुक्याची संजीवनी असणार्‍या कडा सहकारी साखर कारखान्याची दुरवस्था पाहता त्याला पुनरुज्जीवीत करणे सद्यस्थितीत तरी कारखान्याची अवस्था लक्षात घेता सोपे नसल्याचे चित्र आहे.

महिनाभरापूर्वीच कारखाना सुरू करण्यासाठी आणि याला आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी सरकारने पाच सदस्यीय प्रशासकीय समिती नेमल्याचे सांगण्यात येत होते, मात्र यानंतर या समितीने कारखान्याची पाहणी केली की नाही आणि जर केली आहे तर त्यांचा अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे का? असा सवाल तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी विचारत आहेत. मे महिन्यात आ.भीमराव धोंडे यांनी याच कारखाना परिसरात ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा मेळावा घेऊन कारखाना सुरू करण्याबाबत सरकार सहमत असल्याचे सांगत यासाठी लागणारी आर्थिक तरतूद ही महेश मल्टिस्टेटच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते, मात्र हे मिळणारे आर्थिक सहकार्य आणि कारखान्याची डागडुजी होऊन नेमका कधी होणार याबाबत  संभ्रमावस्था आहे.