Thu, Apr 25, 2019 05:34होमपेज › Marathwada › साठ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

साठ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

Published On: Jan 26 2018 1:18AM | Last Updated: Jan 26 2018 12:37AMबीड : दिनेश गुळवे

यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे काउंटडाऊन सुरू झाले असले तरी अद्यापही जिल्हा परिषद शाळेतील 62 हजार विद्यार्थी गणवेशाविनाच आहेत. पालकांना बँकेत खाते उघडण्याची किचकट प्रक्रिया, यासाठी लागणारा वेळ व पैसा, अशिक्षीत पालक व शाळांचा या प्रक्रियेत नसलेला सहभाग यामुळे शुक्रवारचा प्रजासत्ताकदिन बहुसंख्य विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच साजरा करावा लागणार आहे. गणवेेशासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी असूनही तो नियमांच्या अडकित्यात सापडला असल्याने याचा जाच पालकांना होत आहे.

पारदर्शकता या नावाखाली जिल्हा परिषदेचा सुरू झालेला तुघलकी कारभार सर्वसामान्यांना त्रासाचा ठरत आहे. बीड जिल्ह्यात दोन लाखांवर मजूर ऊसतोडणीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रात जातात. यातील बहुतांश मजुरांकडे बँकखाते नाही तर अनेक पालक अशिक्षीत असल्याने त्यांना खाते उघडण्यास अडचणी येत आहेत. भरीस भर म्हणजे काही ठिकाणी बँक खात्यांसाठी पैसे लागत असल्याने आणखीनच अडचणीत भर पडली आहे. खात्यासाठी सरासरी एक हजार रुपये खर्च येत असून, त्यातून चारशे रुपये मिळत असल्याने भीक नको पण कुत्रे आवर म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे. 

जिल्हा परिषदेच्या दोन हजार 566 शाळांमधील एक लाख 24 हजार 172 विद्यार्थी मोफत गणवेश योजनेस पात्र आहेत. एका विद्यार्थ्यांस गणवेशासाठी चारशे रुपये बँक खात्यावर देण्यात येत आहेत. यासाठी विद्यार्थी व पालक यांचे संयुक्त बँक खाते गरजेचे आहे. शिवाय गणवेश खरेदी केल्याची पावतीही लागते. अनेक पालक ग्रामीण भागात बाजारामध्ये गणवेश खरेदी करतात. तेव्हा पावती कोठून घ्यावी, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे पालकांनी या अनुदानाकडे पाठ फि रवाल्याचेही काही ठिकाणी दिसून येते. 

गणवेश खरेदीत काही शालेय समित्या शाळा करीत असल्याने यावर्षी पासून बँक खात्यावर गणवेशाचे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक बहुतांश पालकांकडे असे बँक खाते नसल्याने हा निर्णय सर्वसामान्यांसाठी जाचक ठरत आहेत. पालकांना खाते उघडण्यास लागणारे पैसे, येणार्‍या अडचणी, त्या तुलनेत अगदीत मोजके दिले जाणारे अनुदान, शाळा व शिक्षकांची न होणारी मदत, बहुतांश पालकांचे ऊसतोड, मजुरीसाठी होणारे स्थलांतर आदी कारणांमुळे विद्यार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येत आहे. 

परळी तालुक्यात दहा हजार 416 विद्यार्थ्यांपैकी केवळ 423 विद्यार्थ्यांना गणवेशासाठी पैसे देण्यात आले आहेत. जाचक नियमांमुळे एक लाख 24 हजार विद्यार्थ्यांपैकी 61 हजार 425 विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे मिळाले आहेत. बँक खाते नसल्याने 62 हजार 747 विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. गणवेशासाठी पालकांना दिले जाणारे अनुदान सोप्या पद्धतीने देण्याची मागणी पालकांतून होत आहे.