Tue, Mar 19, 2019 20:26होमपेज › Marathwada › प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची ससेहोलपट 

प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थ्यांची ससेहोलपट 

Published On: Jul 04 2018 2:15AM | Last Updated: Jul 04 2018 12:15AMपरभणी : प्रतिनिधी

दहावी-बारावीनंतर कृषीक्षेत्रातील पदवी, पदविका शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायी असलेल्या भूमिहीन शेतमजुरांचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना महा-ई-सेवा व तहसील कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कृषी पदवीसाठीच्या प्रवेशासाठीची कार्यवाही सुरू असून फॉर्म भरण्याची  अंतिम तारीख ही 5 जुलै आहे. त्यामुळे दोन दिवसांत भूमिहीन शेतमजुरांचे प्रमाणपत्र जर उपलब्ध झाले नाही तर जिल्ह्यातील अनेक भूमिहीन शेतमजुरांच्या मुलांना प्रवेशासाठी मिळत असलेल्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची वेळ प्रशासनातील ऑनलाइनच्या तांत्रिकतेमुळे आली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

विद्यार्थ्यांना वेळेत महसुली प्रमाणपत्र मिळावे, यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश असतानाही गेल्या एक महिन्यापासून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी ई-महासेवा केंद्र व तहसील कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. भूमिहीन शेतमजुरांचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठीही अनेक विद्यार्थी ई-महासेवा केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज भरून मागणी करीत आहेत. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करूनही भूमिहीन शेतमजुरांऐवजी भूमिहीन शेतकरी मिळत असल्याची खंतही विद्यार्थ्यांकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. कृषी पदविका व पदवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या भूमिहीन विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र असल्यास प्रवेश प्रक्रियेत गुणांचा काही प्रमाणात लाभ मिळणार आहे. मात्र ऑनलाइन प्रमाणपत्र प्रणालीत महाऑनलाइनवर लाभार्थींना भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र देण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. देण्यात आलेले प्रमाणपत्र भूमिहीन शेतकरी जर असेल तर ते ग्राह्य धरण्यात येत नसल्याची प्रवेशपूर्व सूचना वनामकृवितर्फे प्रवेश प्रक्रियेपूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गेल्या एक महिन्यांपासूनच भूमिहीन शेतमजुरांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आटापिटा सुरू केला. कागदपत्रांची जुळवाजुळव केली, परंतु प्रमाणपत्रच मिळत नसल्याने विद्यार्थी आता हतबल झाले आहेत. प्रशासनाने यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत आहे.