Thu, Apr 25, 2019 13:55होमपेज › Marathwada › १ ते १० जून दरम्यान देशात शेतकरी संप; संदीप गिड्डे यांची माहिती

संपकाळात दूध, भाजीपाला रोखणार

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:36PMपरभणी : प्रतिनिधी

राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने आयोजित संपात देशातील 130 संघटना एकत्र येत आहेत. हा शेतकरी संप 1 ते 10 जून या कालावधीत एकूण 22 राज्यांत होणार आहे. या संपकाळात शेतकर्‍यांनी शेतीमाल व भाजीपाला विक्री न करण्याबरोबर शहरातील काहीही खरेदी करू नये. तसेच या काळात व्यापार्‍यांना पुरवठा केला जाणारा दूध व भाजीपाला रोखला जाणार असल्याची माहिती कोअर कमिटीचे संदीप गिड्डे पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी लक्ष्मणराव वंगे, राजाराम पाटील, शंकर दरेकर, दिलीप चव्हाण, श्रीकांत तराळ, अतिश गरड, उद्धव भिसे, गौतम भालेराव, आकाश नवघरे, संतोष पवार, ओंकार शिंदे आदी उपस्थित होते. देशपातळीवर या संपासाठी 800 स्वयंसेवकांची फळी तयार करण्यात आली आहे. तसेच 6 वॉर रूम अ‍ॅक्टिव्ह केल्या आहेत. या वॉर रूममधून देशभरात शेतकरी संपातील विविध हालचालींवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. हे आंदोलन अहिंसक मार्गाने केले जाणार आहे. सुरुवातीला 5 दिवस सर्व मालांची नाकाबंदी होणार आहे. संपासाठी एका कोअर कमिटीची स्थापना केली आहे.

यात संदीप गिड्डे पाटील, शिवकुमार कक्‍काजी (मध्य प्रदेश), जगजित सिंग डल्‍लेवाला (पंजाब), गुरनाम चंढुनी (हरयाणा), संतवीर सिंग (राजस्थान), शांताकुमार (कर्नाटक), व्ही. बिजू (केरळ), अक्षय कुमार (ओरिसा), राजकुमार गुप्‍ता (छत्तीसगड) यांचा समावेश आहे. याशिवाय 110 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच शेतकरी संपाची कृती समिती नियुक्‍त केली असल्याचेही त्यांनी सांगितले. संप कालावधीत 5 जून रोजी धिक्‍कार दिवस, 6 जूनला मंदसौर येथे गतवर्षी शहीद झालेल्या शेतकर्‍यांना श्रद्धांजली व सरकारचे ठिकठिकाणी श्राद्ध, 8 जूनला असहकार दिवस, 9 जूनला लाक्षणिक उपोषण, 10 जूनला भारत बंद केला जाणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास पुढे काय करायचे? याची रणनीती 7 जूनला कोअर कमिटी ठरवणार असल्याचेही गिड्डे यांनी सांगितले. 

नाशवंत भाजीपाला विक्रीची शेतकर्‍यांना मुभा ः संपकाळात शेतकर्‍यांचे हित जोपासले जाणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल, असे कोणतेही काम केले जाणार नाही; पण व्यापार्‍यांना हा माल विक्री करू दिला जाणार नाही. जो नाशवंत भाजीपाला आहे त्याची शेतकर्‍यांनी थेट ग्राहकांपर्यंत विक्री करावी, त्यांना तशी मुभा दिली आहे.