Sun, Jul 21, 2019 16:13
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › आंदोलनाने गाजला दिवस

आंदोलनाने गाजला दिवस

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:35PMबीड : प्रतिनिधी

विविध घोषणा देत शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.  राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाकरी भाजून गॅस दरवाढीचा निषेध केला. याच दरम्यान मनसेच्या वतीनेही महागाई विरोधात निदर्शने करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचे सदस्य कालीदास आपेट, प्रा. सुशीला मोराळे, जिल्हाध्यक्ष डॉ. अजिमुद्दन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद व धरणे आंदोलन करण्यात आले. रोजी रोटी दे ना सके, ओ सरकार निकम्मी है..., कर, कर्जा नही देंगे, बिजलीका बिल भी नही भरेंगे... आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. शेतकर्‍यांना रेडीरेकनर प्रमाणे पीककर्ज द्यावे, संयुक्तरित्या शेतीकर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना प्रत्येकी दीड लाखाची कर्जमाफी द्यावी, बोंडअळीचा पीक विमा मिळालाच पाहिजे अशा अनेक मागण्या करत घंटानाद आंदोलनाने शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. गतवर्षीच्या संपावेळी शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीचे सरकारने आश्‍वासन दिले होते, हे आश्‍वासन सरकारने पूर्ण करावे, गारपीटग्रस्तांना नुकसान द्यावी, 2016 साली झालेल्या अतिवृष्टीचे जाहीर केल्याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, पीक कर्जावर दुहेरी व्याज घेणार्‍या बँक अधिकार्‍यांवर कारवाई करावी, पीक कर्ज देताना नो ड्यूज घेऊ नये व तीन लाखांपर्यंत सातबार्‍यावर बोजा टाकू नये अशी मागणी यावेळी कालीदास आपेट व प्रा. सुशीला मोराळे यांनी केले. यावेळी डॉ. अजिमुद्दीन शेख, रामेश्‍वर गाडे, अशोक येडे, रहिमान सय्यद, अशोक हाटवटे, गणेश भिकारे, अनुरथ काशीद, संजय आपेट, लालासाहेब यादव, गंगाभाऊ गाडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँक अधिकार्‍यांची आज बैठक

सुकाणू समितीच्या या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी बँक अधिकारी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक व शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक बोलावली आहे. यावेळी शेतकर्‍यांना पीक कर्ज, शेती कर्ज या संदर्भात येणार्‍या अडचणींवर मार्ग काढण्यात येणार आहे.