Thu, Apr 25, 2019 05:25होमपेज › Marathwada › मेस्मा रद्दचा निर्णय : परळीत अंगणवाडी सेविकांचा जल्लोष 

मेस्मा रद्दचा निर्णय : परळीत अंगणवाडी सेविकांचा जल्लोष 

Published On: Mar 23 2018 4:51PM | Last Updated: Mar 23 2018 4:51PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी 

अंगणवाडी सेविकांना लागू केलेला जुलमी मेस्मा कायदा सरकारने अखेर रद्द केला. मेस्मा रद्दचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत परळीत अंगणवाडी सेविकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा  केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षाच्या दबावामुळे सरकारला झुकावे  लागले. त्यामुळे शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व विधान परिषद  विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे यांचे आभार मानले.

मेस्मा रद्द करावा यासाठी चार दिवस हा विषय सभागृहात लावून धरण्यात आला होता. विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतल्यानेच सरकारला हा मेस्मा रद्द करावा लागला. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत मेस्मा आवश्यकच असल्याची भुमिका घेतली होती. परंतु, विरोधी पक्षाच्या दबावामुळे सरकारला झुकावे  लागले व मेस्मा रद्दचा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयामुळे आंगणवाडी सेविकांनी आनंद व्यक्त केला आहे. ठिकठिकाणी या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. 

परळीतही या निर्णयाचे आंगणवाडी सेविका आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आंगणवाडी सेविकांच्या वतीने न. प. शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, शिवसेनेचे नरहरी सुरवसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे म्हणून  प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. फटाके फोडून व पेढे वाटून अंगणवाडी सेविकांनी  मेस्मा रद्दच्या  निर्णयाचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. 
 

Tags : anganwadi workers,  celebration, beed parli vaijnath, state governement, mesma