Mon, Aug 19, 2019 13:54होमपेज › Marathwada › ST Strike : संपाला गालबोट; कामाच्या ताणामुळे बसचालकाचा मृत्यू

ST Strike : संपाला गालबोट; कामाच्या ताणामुळे बसचालकाचा मृत्यू

Published On: Jun 09 2018 4:46PM | Last Updated: Jun 09 2018 4:46PMहिंगोली : प्रतिनिधी

हिंगोली आगारातील चालकास मागील तीन दिवसांपासून सतत कामावर ठेवून चौथ्या दिवशीही तब्येत ठिक नसतांनाही त्यास कर्तव्यावर जाण्याचे आदेश दिल्यामुळे कामाच्या ताणामुळे त्यांचा दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.9) घडली. या घटनेमुळे संतप्‍त झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संताप व्यक्‍त करित कामावर जाण्यास नकार दिला.

हिंगोली आगारात चालक म्हणून बी.डी.अवचार हे कार्यरत होते. त्यांना आगार प्रशासनाने मागील तीन दिवस हिंगोली ते रिसोड गाडीवर नेमणुक दिली होती. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास ते आपली सेवा बजावून घरी जाण्यासाठी निघाले नंतर त्यांना आगार प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी परत कामावर जाण्याचे आदेश दिले. परंतु, त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरही अधिकार्‍यांनी कामावर जाण्यास बजावल्यामुळे त्यांना कामाचा ताण येवून छातीत दुखू लागल्याचे अवचार यांनी आपल्या सहकार्‍यास सांगितल्या नंतर त्यांना तत्काळ शासकीय रूग्णालयात दाखल करण्यासाठी सहकारी घेवून गेले असता त्यांचा रूग्णालयात दाखल करण्यापुर्वीच मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती आगारातील वाहक-चालकांना समजताच ते संतप्‍त झाल्याने अखेर आगार प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी कर्मचार्‍यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बससेवा काही काळ ठप्प झाली होती. या प्रकरणी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.