होमपेज › Marathwada › आ. क्षीरसागर भाजपमध्ये जाणार?

आ. क्षीरसागर भाजपमध्ये जाणार?

Published On: Dec 01 2017 11:16PM | Last Updated: Dec 01 2017 11:16PM

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे सुरेश धस यांच्यानंतर बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्‍का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद दाराआड चर्चा केली. आ. क्षीरसागर यांना राष्ट्रवादीने दूर केल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीतून त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील राजकारणात बरीच उलथापालथ झाली. राष्ट्रवादीचे सुरेश धस यांनी समर्थक सदस्यांचा पाठिंबा भाजपला दिला, तर आ. जयदत्त क्षीरसागर यांचा समर्थक सदस्यही निवडीवेळी अनुपस्थित राहिला होता. यानंतर राष्ट्रवादीने सुरेश धस यांना पक्षातून निलंबित केले तर आ.  क्षीरसागर यांना दूूर केले. तेव्हापासून आ. क्षीरसागर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होत होती. शुक्रवारी मुख्यमंत्री बीड दौर्‍यावर असताना त्यांनी आ. क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट देऊन बंद दाराआड चर्चा केली. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत क्षीरसागर यांनी विविध कार्यक्रमांना हजेरीही लावली. जयदत्त क्षीरसागर आणि मुख्यमंत्री यांना एका व्यासपीठावर पाहून अनेकांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले. फडणवीस, मुंडे आणि क्षीरसागरांच्या या भेटीमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या भेटीतून आ. क्षीरसागर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोल्हार यांच्या निवासस्थानी भोजन

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार यांच्या बीड येथील निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोजन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत ना. पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आ. क्षीरसागर, आ. विनायक मेटे हेही उपस्थित होते. यानंतर आ. मेटे यांच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीलाही मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन विविध प्रश्‍नांवर चर्चा केली.

नगराध्यक्षांकडून स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधू डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

दरेकरांची नाराजी दूर

जिल्हा परिषदेच्या सभापती शोभा दरेकर या राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याप्रसंगी एका कार्यक्रमात माजी आ. साहेबराव दरेकर हे व्यासपीठावर न बसता खाली बसले होते. ही बाब व्यासपीठावरील मान्यवरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माजी आ. साहेबराव दरेकर यांना व्यासपीठावर बोलावले. यानंतर दरेकर यांनीही व्यासपीठावर विराजमान होत आली नाराजी दूर झाल्याचेच संकेत दिले.