Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Marathwada › दाभोलकर हत्याप्रकरणी विशेष कृतीदल नेमा : डॉ हमीद

दाभोलकर हत्याप्रकरणी विशेष कृतीदल नेमा : डॉ हमीद

Published On: Dec 21 2017 7:54PM | Last Updated: Dec 21 2017 7:53PM

बुकमार्क करा

प्रतिनिधी : लातूर 

महाराष्ट्र अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांस जेरबंद करण्यासाठी विशेष कृती दल (स्पेशल टास्क फोर्स) नेमावे, अशी मागणी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे पुत्र तथा अंनिसचे सरचिटणीस डॉ. हमीद यांनी केली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रधान सचिव माधव बावगे हेही उपस्‍थित होते.

डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करुन तपासकामात सातत्य राहण्यासाठी व मारेकरी हाती लागण्यासाठी स्पेशल टास्क गरजेचा असल्याचे ते म्हणाले. दाभोलकरांच्या खूनाला ५२ तर पानसरे यांच्या हत्येला ३४ महिने पूर्ण झाले आहेत. तथापि, या दोन्ही खुनांतील संशयीत मारेकरी सारंग अकोलकर व विनय पवार यांना पकडण्यात शासन दिरंगाई करीत आहे. 

या प्रकारामुळे पोलिसांचे हसे होत आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा धाक राज्यात राहीला नाही, असा संदेश जात आहे. या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी अंनिसने देशव्यापी जवाब दो आंदोलन केले. तरीही  शासनाची इच्छाशक्ती जागृत झाली नाही, अशी खंत डॉ. हमीद यांनी केली. 

खुनातील संशयीत व सनातनचे साधक अकोलकर व पवार गजाआड होत नाहीत, तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. सीबीआयने  दोन संशयीत मारेकऱ्यांवर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस ठेवले आहे. राज्य शासनानेही बक्षीस जाहीर केले आहे. परंतु, फरार आरोपींच्या संपत्तीवर जप्ती आणण्याची प्रक्रिया अजुनही झालेली नाही. ही दिरंगाई विवेकवाद्यांसाठी धोका बनली आहे. 

अकोलकर व पवार यांचे साथीदार प्रवीण लिमकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेगडे हे २००९ पासून मडगाव बॉम्ब स्फोटानंतर फरार आहेत. सारंग अकोलकरवर तर इंटरपोलची रेडकॉर्नर नोटीस असूनही त्यास पकडण्याचे पुरेसे प्रयत्न होत नाहीत. या दिरंगाईमुळेचे डॉ. दाभोलकर, पानसरे, लंकेश व कलबुर्गी यांचे खून झाले . फरार आरोपी वेळीच गजाआड झाले असते तर हे खून झाले नसते असे डॉ. हमिद म्हणाले. 

दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यातील अंनिसचे कार्यकर्ते आमदार व खासदारांची शिष्टमंडळासह भेट घेऊन या दिरंगाईचा जाब विचारणार असून संसद व विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा, अशीही मागणी ते करणार असल्याचे हमीद यांनी सांगितले. सोशल मीडियावरुनही जनतेने जाब विचारावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.