होमपेज › Marathwada › लातुरला सोयापार्क तर उस्मानाबादला फटाका क्लस्टर : सुभाष देसाई

लातुरला सोयापार्क तर उस्मानाबादला फटाका क्लस्टर : सुभाष देसाई

Published On: Jun 28 2018 8:36PM | Last Updated: Jun 28 2018 8:35PMप्रतिनिधी : लातूर

गत दहा वर्षांत लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादनात ४० पटीने वाढ झाली असून या धान्यावर प्रक्रीया उद्योग उभारण्यासाठी लातूर येथे सोया पार्क तर उस्मानाबादेतील तेरखेड्यात फटाका क्लस्टर उभारण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी लातूर येथे गुरुवारी केली.

लातूर एमआयडीसीतील उद्योजकांची देसाई यांनी लातुरच्या विश्रामगृहावर बैठक घेतली. खासदार चंद्रकांत खैरे, एमआयडीसी औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता नागे यांची प्रमुख उपस्थिती होती. देसाई म्हणाले लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होत असले तरी येथे सोयाबीनचा प्रक्रीया उद्योग केवळ ऑईल मिल पुरताच मर्यादित आहे.  सोयाबीनपासून दुध, पनीर, चॉकलेट असे विविध २५ उपपदार्थ बनू शकतात. विशेष म्हणजे त्याला मोठी मागणीही आहे.

सोयाबिनला भाव मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. सोयापार्क उभारले तर सोयाबिनला भाव, नवउद्योजकांना प्रोत्सहान तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. याच भावनेतून हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे ते म्हणाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेड्याचे फटाके प्रसिध्द आहेत. तेथे फटाका क्लस्टर उभारले तर तेथील फटाक्यांना मागणी वाढेल, तेरखेड्याचे फटाके राज्यभर जातील. तेथील उद्योजकांनाही त्याचा लाभ होईल हाच उद्देश यामागे असल्याचे देसाई म्हणाले. राज्य सरकार येत्या सप्टेंबरमध्ये वेगवेगळ्या योजनांचा अंतर्भाव असलेले नवीन औद्योगिक धोरण जाहीर करणार आहे. सहकारी संस्था किंवा खासगी व्यक्ती औद्योगिक वसाहत उभारत असेल तर तेथे शासन पायाभूत सुविधा पुरवेल, असेही ते म्हणाले. औद्योगिक परिसरातील लमत्ताधारकांडून  ग्रामपंचायत, नगरपंचायत, मनपा, एमआयडीसी कर वसुली करतात अशी तक्रार उद्योजकांनी केली असता ही बाब गंभीर असल्याचे सांगत लवकरच यावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.