Wed, Aug 21, 2019 19:54होमपेज › Marathwada › चक्‍क जावयाची गाढवावरून मिरवणूक (व्‍हिडिओ)

चक्‍क जावयाची गाढवावरून मिरवणूक (व्‍हिडिओ)

Published On: Mar 02 2018 11:02PM | Last Updated: Mar 02 2018 11:05PMकेज : प्रतिनिधी 

केज (जि. बीड) येथील विडा येथे यावर्षीही मोठ्या जल्‍लोषात जावायाची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. या वर्षीचा मान विडा येथील रहिवासी व जावई महादेव घोरपडे यांना मिळाला आहे. 
गेल्या ८० वर्षापासून विडा येथे धुळवडीच्या दिवशी सकाळी जावायाची गाढवावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्याच्या परपंरेला चेष्टा मस्करीने सुरवात झाली. विडा गावचे आनंदराव ठाकुर यांनी स्वत:च्या जावायाची गाढवावरुन मिरवणूक काढली होती. ही चेष्टा मस्करीत काढलेली जावायाची मिरवणूक विड्याची परपंरा बनल्याने धुळवडीचे खास आकर्षण असलेली जावायाची गाढवावरची मिरवणूक पाहण्यासाठी परिसरासह जिल्ह्यातील नागरिक विडा येथे हजेरी लावत मिरवणुकीत सहभागी होतात.

यावर्षीचा मान विड्याचे रहिवासी जावई असलेले महादेव घोरपडे यांना मिळाला. उत्सव समितीचे गोविंद देशमुख, लहू घोरपडे, शुभम पटाईत, नारायण वाघमारे, विकास दुनघव यांनी गुरुवारी मध्यरात्री जावाई महादेव घोरपडे यांना त्यांच्या शेतात पकडले. 

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता महादेव घोरपडे यांना गाढवावर बसवून ग्रामपंचायत कार्यालयापासून मिरवणूकीला वाजतगाजत सुरवात करण्यात आली. 

गाढवावरील जावायाची मिरवणूक गावात मिरवल्यानंतर मिरवणुकीचा शेवट सकाळी साडे अकरा वाजता हनुमान मंदीराजवळ करण्यात आला. यावेळी जावाई महादेव घोरपडे यांना उत्सव समितीतर्फे कपड्याचा आहेर करण्यात आला तर सासरेनी सोन्याची अंगठीचा आहेर जावायास करत सन्मानित केले ही मिरवणूक पाहण्यासाठी गावातील महिला पुरुषांसह युवकांनी मोठी गर्दी केली होती. 
महादेव घोरपडे यांचे सासरे एकनाथ पवार हे ही विडा गावचे जावाई आहेत. त्यांचीही पाच वर्षापुर्वी गावात गाढवावरुन मिरवणूक काढण्यात आली होती तर यावर्षी त्यांच्या जावायाची गाढवावरुन मिरवणूक काढण्यात आली.