Mon, Jul 22, 2019 03:03होमपेज › Marathwada ›  जवानांच्या वाहनाला  दिंद्रुडजवळ अपघात,  ९ जवान जखमी

 जवानांच्या वाहनाला  दिंद्रुडजवळ अपघात,  ९ जवान जखमी

Published On: Dec 03 2017 4:01PM | Last Updated: Dec 03 2017 4:03PM

बुकमार्क करा

परळी वैजनाथ : प्रतिनिधी 

बीड-परळी हायवेवरील दिंद्रुड येथून हाकेच्या अंतरावर संगम स्टेजवर परळीकडे जाणाऱ्या भारतीय लष्कराच्या गाडीला आज दुपारी दिड वाजता अपघात झाला. यात ९ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर जिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरु आहेत.  

परळी येथील जवान  मुरलीधर शिंदे यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमास अहमदनगरहून भारतीय लष्कराच्या १५ जवानांची तुकडी मानवंदना देण्यासाठी निघाली होती. दिंद्रुडच्या जवळ बीड-परळी हायवेवर जवानांच्या टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्‍पो रस्त्यावर पलटी झाला. यात दोन जवान गंभीर तर, सात किरकोळ जखमी झाले असल्याचे दिंद्रुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद असिफ यांनी सांगितले. जखमींना तात्काळ मिळेल त्या वाहनाने बीड व माजलगांव येथिल सरकारी रुग्णालयात पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.

दिंद्रुड पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटना स्थळावर दाखल झाल्याने मोठी हानी टळली. संगम, दिंद्रुड, भोपा ग्रामस्थांचे दिंद्रुड पोलिसांना मोठे सहकार्य मिळाल्याने गाडीत अडकलेल्या जवानांना तात्काळ बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, क्रेन घटनास्थळावर दाखल झाले असून, रस्ता सुरुळीत करण्यासाठी टेंम्पो रस्त्यावरुन हटवण्यात आला आहे.