होमपेज › Marathwada › वेगळा मार्ग निवडत बहीण-भावंडाची यशाला गवसणी

वेगळा मार्ग निवडत बहीण-भावंडाची यशाला गवसणी

Published On: Feb 16 2018 2:30AM | Last Updated: Feb 16 2018 1:41AMपाटोदा : महेश बेदरे 

प्रयत्नांती परमेश्‍वर या म्हणीचा अगदी तंतोतंत प्रत्यय देणारी गोष्ट घडली असून पाटोदासारख्या ग्रामीण भागातील असूनही शिक्षणात एक वेगळी वाट निवडून एकाच दिवशी प्रशासकीय सेवेत निवड होण्याचा दुर्मिळ मान पाटोदा येथील साधना विलास भोसले व विवेक विलास भोसले या बहीण-भावंडांना मिळाला आहे. प्रामाणिक प्रयत्न व त्याला मेहनतीची जोड असल्यास हमखास यश मिळतेच असे पुन्हा एकदा समोर आले आहे.

पाटोदा येथील विलास भोसले यांची मूल असलेली विवेक व साधना या बहीण भावाच्या जोडीने शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे मार्ग निवडून हे यश मिळविले. साधना व विवेक यांचे प्राथमिक शिक्षण पाटोदा येथेच झाले, विवेक हा 8 वी नंतर नवोदय विद्यालयासाठी उत्तीर्ण झाला तर साधनाने 10 वीत 93 टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा मान मिळविला व 11 वी 12 वी साठी लोणी या ठिकाणी प्रवेश मिळविला. पहिल्यापासूनच मेहनती असलेल्या साधनालाही डॉक्टर होण्याची इच्छा होती, मात्र तिने या ही पेक्षा वेगळा मार्ग निवडत व या भागात फारसे परिचित नसलेल्या क्षेत्रात म्हणजे न्यायसहाय्यक विज्ञानशास्त्र या शाखेत पदवीसाठी औरंगाबाद येथे प्रवेश घेतला व ही पदवी विद्यापीठातून विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. तर विवेक यानेही 12 वी नंतर बी. एस. सी. नर्सिंगचा मार्ग निवडला. खरे तर पाटोद्यासारख्या ग्रामीण भागात नर्सिंग म्हणजे केवळ मुलींसाठीच असते असाच समज होता मात्र विवेकने हे वेगळे क्षेत्र निवडून या मध्ये करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे आपली पदवी पूर्ण केली.