Thu, Jun 20, 2019 14:39होमपेज › Marathwada › ... मग नाणारचा प्रकल्प उस्मानाबादेत आणा!

... मग नाणारचा प्रकल्प उस्मानाबादेत आणा!

Published On: Apr 28 2018 9:22PM | Last Updated: Apr 28 2018 9:22PMउस्मानाबाद : भीमाशंकर वाघमारे

बहुचर्चित नाणार (जि. सिंधुदुर्ग) येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध पाहून मग हा प्रकल्प उस्मानाबादेत आणा. यामुळे बेकारीही कमी होईल व मराठवाड्याच्या विकासास हातभार लागेल, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. मागणीमागचे उद्देश पटणारे असले तरी प्रत्यक्षात तांत्रिकद्ष्ट्या हा प्रकल्प होणे शक्य आहे का? याबाबतीत मात्र कोणीच पुढे येऊन बोलत नसल्याने नागरिकही बुचकळ्यात पडले आहेत.

“मुळात उस्मानाबाद हा मागास जिल्हा. त्यातही आता तर केंद्राच्या अहवालात तिसरा क्रमांक लागलेला. हा प्रकल्प आला तर बेरोजगारीचा प्रश्‍न सुटेल. विकास दर वाढेल. शहरालगत कौडगाव एमआयडीसीत दीड हजार एकर जागाही उपलब्ध आहे. जमीन संपादनाचा विषयच नाही. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग जवळच आहेत. उजनीचे पाणी उपलब्ध आहेच. त्यामुळे हा प्रकल्प सरकारने उस्मानाबादेत आणावा.” वाचताक्षणी मनाला पटणारा हा मेसेज जिल्ह्यात प्रत्येकाच्या मोबाईलवर धुमाकूळ घालत आहे. वास्तविक रिफायनरी प्रकल्प हा काय असतो, तो कुठे असावा याचे निकष, संकेत यात कोणीही शिरत नसल्याने अथवा राजकारण्यांनीही यावर प्रबोधनाची भूमिका न घेतल्याने ‘नाणार’ची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. दरम्यान, याबाबत भाजपचे आ. सुजितसिंह ठाकूर यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता प्रकल्पांची प्रक्रिया ही फारत तांत्रिक बाबींवर आधारलेली असते. माहिती घेऊन बोलू, अशी प्रतिक्रिया दिली.

यामुळे शक्य नाही उस्‍मानाबादेत प्रकल्‍प

वास्तविक नाणार येथे होणारा हा प्रकल्प म्हणजे तेल शुध्दीकरणाचा आहे. आपल्या देशात आखाती राष्ट्रांतून क्रूड तेलाची आयात मोठ्या प्रमाणात होते. ती जलमार्गाने अधिक सोयीची व कमी खर्चाची असते. त्यामुळे असे प्रकल्प शक्यतो समुद्रकिनार्‍यापासून जवळच असतात. ही बाब विचारात घेतली तर उस्मानाबादेत हा प्रकल्प शक्यच नाही. तो उभारण्याचा धाडसी निर्णय घेणेही शक्य नाही. कारण वाहतुकीवरच प्रचंड खर्च होईल. कोकणातून थेट रेल्वेमार्ग उस्मानाबादसाठी नाही. रस्तामार्गे अंतर ५०० किलोमीटरपेक्षाही अधिक आहे.

Tags : sindhudurg, nanar refinery, nanar project, osmanabad, social media