Sun, Apr 21, 2019 01:52होमपेज › Marathwada › आधुनिक युगातही सर्जा-राजाचे महत्त्व कायम

आधुनिक युगातही सर्जा-राजाचे महत्त्व कायम

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 10:13PMसेलू : प्रतिनिधी 

सध्याचे युग हे अधुनिक युग आहे. नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रांमध्ये केल्या जात आहे. शेतीमध्येसुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असला तरी सर्जा-राजाचे महत्त्व आजही कायम आहे.

पूर्वीच्या काळी शेतीमध्ये मशागतीसाठी सर्जा-राजाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असे. जमीनदार शेतकरी यांच्याकडे पाच ते सहा बैलजोड्या राहत असत; परंतु सध्याच्या काळात मजुरांअभावी शेतीत कामे करून घेणे जिकिरीचे झाले आहे. जास्त जमीन असलेल्या शेतकर्‍यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ट्रॅक्टरचा शेती मशागतसाठी उपयोग करण्यात येत आहे. मात्र चार ते पाच बैल जोडीऐवजी दोन किंवा एक तरी बैलजोडी आवश्यक असल्याने ते बैलजोडी सोबत ठेवत आहेत. 

सध्या शेतीमध्ये सालगडी तसेच मजूर मिळणे कठीण झाले आहे, तर सालगड्याअभावी शेती करणे शेतकर्‍यांना त्रासदायक ठरत आहे. सर्जा-राजाची देखरेख स्वत: मालक शेतकर्‍यांना करावी लागत आहे. उन्हाळ्यामध्ये शेती मशागतीची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करण्यात येत असली तरी पावसाळ्यामध्ये मात्र शेतकर्‍यांना सर्जा-राजावरच अबलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे सर्जा-राजाचे महत्त्व आजही कायम आहे. मात्र पशुपालकांनी पशुधन पाळणे कमी केले असल्यामुळे सर्जा-राजाच्या किमती लाखाच्या वर पोहोचल्या आहेत. सध्या शेती अडचणीची असली तरी मात्र शेतकरी सर्जा-राजाला कायम आपल्यासोबत ठेवत आहे.