होमपेज › Marathwada › वैद्यनाथाची परळी :  वैद्यनाथ मंदिर एक  ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा(Video)

वैद्यनाथाची परळी :  वैद्यनाथ मंदिर एक  ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा(Video)

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:40AM



परळी वैजनाथ : रविंद्र जोशी

देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत. या मध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झाले आहे. परळीचे वैद्यनाथ मंदिर एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक समृद्ध वारसा आहे. त्याचबरोबर वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून वैद्यनाथ ओळखले जाते. परळी शहराच्या पश्चिमेला मेरू पर्वताच्या पायथ्याशी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे प्राचीन मंदिर वसलेले आहे. या शिवपिठाचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी शंकराचा निवास हा सहकुटुंब आहे. वैद्यनाथाचे मुळ मंदिर हे यादवकालिन आहे. बाराव्या शतकाच्या प्रारंभी हे मंदिर बांधले गेले असावे असे मानले जाते. त्यानंतर शालिवाहन शक १६९९ ला इंदोरचे राजे मल्हारराव होळकर यांच्या सूनबाई व खंडेराव होळकर यांच्या पत्नी साध्वी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरू केले. याचा उल्लेख मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात असलेल्या शिलालेखात करण्यात आल्याचे दिसून येते. 

 श्री. वैद्यनाथ मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती आहे. या मंदिराच्या दगडी शिखरावर विविध देवतांच्या मुर्ती आहेत. मुख्य मंदिराला पाच दरवाजे आहेत. पूर्वेकडील दरवाजा महाद्वार म्हणून ओळखला जातो. या वरील दगडी कोरीव काम, शिल्प व भक्कम बांधकाम सर्वांचे लक्ष वेधून घेते. चैत्र पोर्णिमा व अश्विन पोर्णिमा या दिवशी सूर्याची पहिली किरणे याच प्रवेशद्वारातून वैद्यनाथाच्या पिंडीवर पडतात. या महाद्वारावर त्रीकाल चौघडा करण्यात येतो. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर विस्तीर्ण, उंच व प्रशस्त असा सागवानी लाकडाचा बिनखांबी सभामंडप आहे. १८८५ च्या सुमारास हे काम करण्यात आले आहे. या मंडपाच्या भव्यतेने मंदिराची शोभा वाढली आहे. या मंडपाखाली आठ फुट लांब व त्यापेक्षा कमी रुंद असा दगडी चबुतरा असून त्यावर चार कोरीव दगडी खांब आहेत. या खांबावर दगडी मंडप उभारलेला आहे. या मंडपात नंदीच्या चार व गणेशाची एक मुर्ती आहेत. आत आल्यावर विशाल गर्भगृह आहे. या गर्भगृहात प्रवेश करताना गणेश व पार्वतीचे दर्शन होते. या ठिकाणी शाळिग्रामची दिव्य पिंड आहे. 

 

या मंदिराच्या परिसरात ओवर्या, शिवमंदिरे, ध्यान मंदिर, वीरभद्र पितळी विशाल मुर्ती, नारद मंदिर, गायत्री मंदिर आहे. मंदिरालगत भव्य दगडी दीपमाळेचा दीपस्तंभ आहे. याच्या पायथ्याशी अहिल्याबाई होळकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे. मार्च १९८५ ला देवल कमिटीने हा पुतळा बसवला आहे. वैद्यनाथ मंदिर हा एक ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा आहे. 

धार्मिक महत्त्व 

कांतीपुरी,वैजयंतीक्षेत्र, जयंतीक्षेत्र, प्रभाकर क्षेत्र, पर्यली ही परळी वैजनाथ ची प्राचीन नावे आहेत. जगाच्या उद्धारासाठी भारतभुमीत शिवलिंग आवतरले. वायूच्या संघर्षाने या ज्योतिर्मय स्वरुपाचे बारा भाग होउन ते इतस्ततः विखुरले तीच आज प्रसिद्ध असलेले ज्योतिर्लिंगे होत, असा उत्पत्ती विषयी 'परळी महात्म्य' या प्राचीन ग्रंथात उल्लेख आहे.