होमपेज › Marathwada › चारच महिन्यांत ‘शिवशाही’भंगार

चारच महिन्यांत ‘शिवशाही’भंगार

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:48PMपरभणी : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागांतर्गत तब्बल 17 शिवशाही बस आहेत. तसेच आता नव्याने 2 शयनयान शिवशाही बस मिळाल्या आहेत, परंतु या बसच्या देखभालीअभावी अवघ्या चारच महिन्यांत या बस भंगार अवस्थेकडे गेल्याचे वास्तव समोर आले आहे. यात एका शिवशाहीच्या डाव्या बाजूच्या साईड ग्लासला चक्क दोरीचा सहारा द्यावा लागल्याचे पाहावयास मिळाले आहे.

लाल रंगातील सर्वसाधारण बस आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा देणार्‍या, परंतु अधिक भाडे आकारणी करणार्‍या शिवनेरी बस यामध्ये शिवशाहीचा पर्याय ठेवत महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. मागील चार महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या शिवशाही बसला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निमआराम बसच्या तुलनेत शिवशाहीचे भाडे अधिक आहे, परंतु खासगी वाहतुकदारांच्या तुलनेत ते कमी आहे. यामुळे खासगी वाहतुकीकडे गेलेला प्रवासी शिवशाही अवतरल्यानंतर पुन्हा माघारी फिरल्याचे चित्र आहे. यात शनिवारी रात्री 9 वाजता परभणी बसस्थानकावरून पुणे जाण्यासाठी शिवशाही बस क्र.(एम.एच.06 बी.डब्ल्यु.0911) हिला मार्गस्थ करण्यात आले. 

यावेळी सदरील बसच्या डाव्या बाजूला असलेला साईड ग्लास तुटलेला होता. त्याला एका प्लास्टिक दोरीचा सहारा देऊन ती दोरी समोरील काचेच्या खालच्या बाजूला बांधण्यात आली होती. याबाबत संबंधित बसच्या चालकास विचारणा केली असता दोरी सोडली तर हा ग्लास बाजूला सरकतो असे त्याने सांगितले. सध्या केवळ लालपरीला दुरुस्ती करण्यासाठी सर्व सुविधा वर्कशॉपमध्ये कार्यरत आहेत. शिवशाही बसची लांबी व उंची जास्त आहे. यामुळे सदरील बस तेथे दुरुस्त करणे कठीण आहे. तसेच दुरुस्तीची माहिती कामगारांना नाही. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे शासनाने प्रवाशांच्या सुखासाठी पाठवलेली बस ही अवघ्या चार महिन्यांत भंगार झाल्याची चर्चा प्रवाशांमधून होत होती.