Sun, Aug 25, 2019 08:39होमपेज › Marathwada › सेनेच्या संघटनात्मक बांधणीतून इच्छुकांची चाचपणी

सेनेच्या संघटनात्मक बांधणीतून इच्छुकांची चाचपणी

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 1:14AMहिंगोली : प्रतिनिधी

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूका स्वबळावर लढविण्याची घोषणा करण्याबरोबरच विधानसभा निहाय संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकार्‍यांच्या नेमणूका केल्या आहेत. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून बीडचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी हिंगोलीतील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील संघटन बांधणीबरोबरच इच्छूकांची चाचपणी केली. यात सर्वाधिक इच्छूक कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दिसून आले. तर दुसरीकडे वसमत विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. मुंदडा यांच्या भूकेवर पुढील उमेदवार ठरणार असला तरी अनेकांनी विधानसभेबाबत इच्छा व्यक्‍त केली आहे.

भाजपसोबत ताणलेले संबंध लक्षात घेत शिवसेने वरिष्ठस्तरावरून हालचाली गतिमान केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मागील तीन दिवसांपासून राज्यभरात संघटनात्मक बांधणीबरोबर उमेदवारांच्या गाठीभेटी घेण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दोन दिवसांपासून शिवसेनेचेे बिड जिल्हा प्रमुख अनिल जगताप हे हिंगोलीत तळ ठोकून आले. ते मतदारसंघनिहाय चाचपणी करीत आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा असल्याने इच्छूकांची संख्या घटल्याचे दिसून आले. बाजारसमितीचे माजी सभापती रामेश्‍वर शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भैय्यापाटील गोरेगावकर यांनी विधानसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगितले. तर सर्वाधिक इच्छूक मात्र कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दिसून आले.

यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगरसह माजी सभापती डॉ.  वसंतराव देशमुख, जि. प.  चे माजी उपाध्यक्ष डी. के. दुर्गे, युवा सेनेचे बाजीराव सवंडकर यांनी विधानसभेसाठी इच्छा दर्शविली.तर वसमत विधानसभा मतदारसंघात मात्र विद्यमान आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी लोकसभेची निवडणूक लढविल्यास त्यांचे उत्तराधिकारी म्हणून काही नावे समोर आली आहेत. त्यात प्रामुख्याने उपजिल्हा प्रमुख सुनिल काळे, तालुकाप्रमुख बालाजी तांबोळी, राम मुंदडा,अकुश आहेर, दिपक मुंदडा यांची नावे समोर आली आहेत. वसमत विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नेते अ‍ॅड. शिवाजी जाधव यांचे पक्ष संघटन मजबूत होत असल्याने त्यांना तोड देण्यासाठी सेनेला जनाधार असलेल्या नेत्याची गरज आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचेही मतदारसंघावर वर्चस्व असल्याने वसमतच्या उमेदवाराकडे सेना नेतृत्वाचे विशेष लक्ष असणार आहे.

घुगे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी संपर्क वाढविला असल्याने सध्या या मतदारसंघात आतापासूनच राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच मितभाषी असलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ.संतोष टारफे यांनी खा.राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारल्यामुळे सेना,भाजपासमोर काँग्रेसचे तगडे आव्हान राहणार आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्‍ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाचे माजी आ.गजानन घुगे यांनी दोन वेळेस शिवसेनेकडून प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर खा. राजीव सातव यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेऊन आणला. मागील दहा वर्षांपासून या मतदारसंघाचे समिकरण बदलल्यामुळे हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात आहे. त्यातच सेनेचे माजी आ. गजानन घुगे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपकडून दावेदारी सांगितल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षीत आहे.